भूकंप प्रतिरोधक इमारतींचा रेकॉर्ड नाही!
By admin | Published: May 2, 2015 01:32 AM2015-05-02T01:32:45+5:302015-05-02T10:25:11+5:30
नेपाळला उद्ध्वस्त करणाऱ्या प्रलयंकारी भूकंपाने मुंबईसाठीही धोक्याची घंटा वाजवली आहे़ मात्र भविष्यात असा भूकंप झाल्यास त्यापुढे तग धरू शकणाऱ्या
मुंबई : नेपाळला उद्ध्वस्त करणाऱ्या प्रलयंकारी भूकंपाने मुंबईसाठीही धोक्याची घंटा वाजवली आहे़ मात्र भविष्यात असा भूकंप झाल्यास त्यापुढे तग धरू शकणाऱ्या इमारतींची नोंद पालिकेकडे नाही़ त्यामुळे मुंबई व आसपासच्या शहरातील भूकंप प्रतिरोधक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचा पालिकेचा विचार सुरू आहे़
गेल्या आठवड्यात नेपाळ तसेच उत्तर भारतातील काही शहरांना भूकंपाचा धक्का बसला़ या नैसर्गिक आपत्तीत हजारो लोकांचे बळी गेले़ अशा भूकंपाचा धोका मुंबई, नाशिक, पुणे या शहरांनाही असल्याच्या अफवा पसरू लागल्या आहेत़ तूर्तास असा कोणताही धोका मुंबईसाठी वर्तविण्यात आलेला नाही़ मात्र भूकंप प्रतिरोधक इमारतींची यादी असणे आपत्तीकाळात शहरासाठी दिलासादायी ठरू शकते़ संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारीसाठी ही माहिती एकत्रित केली जाणार आहे़ यासाठी सर्व सरकारी व खाजगी प्राधिकरणांना अशा इमारतींची यादी सादर करण्याचे आवाहन पालिका करणार आहे़ किती रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे किती व कोणत्या इमारती तग धरू शकतात, याची यादी उपलब्ध असल्यास या इमारतींचा वापर आपत्तीकाळात निवाऱ्यासाठी होऊ शकेल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)