सरवणकरांनी फायरिंग केलेली, पोलिसांचा रिपोर्टही होता, मग कारवाई का नाही? विनायक राऊतांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 04:15 PM2023-11-29T16:15:50+5:302023-11-29T16:16:25+5:30
सत्तेचा माज आलेले मिंध्ये सरकार पोलिसांच्या बळाचा वापर करून दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली आहे. अतिरेक्यांवर जशी धाड घालतात ...
सत्तेचा माज आलेले मिंध्ये सरकार पोलिसांच्या बळाचा वापर करून दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली आहे. अतिरेक्यांवर जशी धाड घालतात तसे त्यांना पकडले आहे. सुर्वे आणि सरवणकर यांच्या कृत्यावर का कारवाई नाही झाली? सरवणकर यांनीच फायरिंग केल्याचा रिपोर्ट पोलिसांनी दिला होता, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी विचारला आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हाता तोंडाशी आलेलं पीक गेले. तेलंगणामध्ये जाऊन लोचटगिरी सुरू आहे. दुसरीकडे शेतकरी टाहो फोडतो आहे. सरकारने आधार द्यायला पाहिजे, अशी टीका राऊत यांनी केली.
गद्दार गट भाजपच्या इशाऱ्यावर चालला आहे. अजित पवार आणि शिंदे गट तिथे जाऊन प्रचार करतात. लोकांनी तिथे शिंदे गटाचा धिक्कार केला आहे, असे राऊत म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या जयंती निमित्त नाशिकमध्ये महाशिबिर होणार आहे. शेतकरी नोकरदार, महिला अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे. यानंतर नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. 23 जानेवारीला या महाशिबिराचे आयोजन केले गेले आहे, असे राऊतांनी सांगितले.
मराठा आणि ओबीसी तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातले मंत्री व्यासपीठावर येऊन विसंवाद निर्माण करतात हे योग्य नाही. मंत्र्यांनी रस्त्यावर येऊन शड्डू ठोकणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून हे होतेय असा संशय आहे, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.
भुजबळ यांनी राजीनामा द्यावा असे वक्तव्य विखे पाटील यांनी केले आहे. विखे पाटलांचे मला कौतुक वाटते. त्यांनी धारिष्ट्य दाखवले ते मुख्यमंत्री यांनी दाखवायला पाहिजे होते. समाजात भांडण लावले जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला.