नाशिक - मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. सरकारशी लागेबांधे असणाऱ्यांनी आधीच नोटा बदलून घेतल्या असा गंभीर आरोप शरद पवारांनी केला.
किसान मंचाच्या शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियानाच्या समारोपावेळी शरद पवार नाशिकमध्ये आले होते. यावेळी बोलताना त्यांनी काळा पैसा असणा-यांचे सरकारशी संबंध असल्याने त्या लोकांनी आधीच नोटा बदलून घेतल्या. मात्र, सर्वसामान्य लोक रांगेत उभे राहिले अशी घणाघाती टीका केली. नोटाबंदीच्या विषयावर बोलताना पवार यांनी, मारुतीच्या बेंबीतील विंचवाची गोष्ट कथन केली. ते म्हणाले, पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा केली त्यावेळी अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले, परंतु नंतर मात्र सर्वांनाच त्याचा झटका बसला. नोटाबंदीने काळा पैसा बाहेर येईल, असे सरकारला वाटत होते, प्रत्यक्षात बंदी घातलेल्या ८६ हजार कोटी नोटा पुन्हा बॅँकेत परत आल्या परंतु काळा पैसा कोठेच सापडला नाही. ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांचे सरकारशी असलेले लांगेबांधे पाहता त्यांनी नोटाबंदीपूर्वीच पैसा पांढरा करून घेतल्याचा आरोपही पवार यांनी केला.
इंधनाच्या दरवाढीतून सरकारने सामान्यांची लूट सुरु केली आहे अशी टीका त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून सरकारवर केली. यापूर्वीही अनेकदा पवारांनी नोटाबंदीवरून सरकारवर टीका केली आहे.
शेतमालाला किंमत नाही, कर्जमाफी देण्याची सरकारची नियत नाही, महागाईने सर्वच घटकांचे कंबरडे मोडलेले असल्याने राज्यकर्त्यांना जाब विचारण्याची आता वेळ आली असून, शेतकºयांच्या आंदोलनाला नुसता पाठिंबाच नव्हे तर त्यांच्या सोबत रस्त्यावर उतरण्यास मी स्वत: तयार असल्याची घोषणा राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. सरकारला ठराविक मुदत द्या, त्यांनी शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ केले नाही तर मग एकदाच काय ते होऊन जाऊ द्या, असा इशाराही त्यांनी दिला.राष्टÑवादी कॉँग्रेसच्या किसान मंचच्या राज्यस्तरीय प्रतिनिधींच्या आयोजित अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून किसान मंचचे प्रदेश अध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे होते. यावेळी शरद पवार म्हणाले, देशात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याची सर्वाधिक किंमत कष्टकरी, शेतमजूर, कारखान्यात काम करणारा कामगार व मध्यमवर्गाला मोजावी लागत आहे. महागाईने गाठलेला उच्चांक पाहता या घटकावर दैनंदिन संकट उभे राहत असून, नुकत्याच झालेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे तर सरकारने सरसकट लूट चालविली असल्याचा आरोप केला.देशात शेतमालाच्या घसरलेल्या किमतीचा मुद्दा उपस्थित करून पवार पुढे म्हणाले, सरकारने अलीकडेच गहू, ज्वारी, धानाच्या आधारभूत किमतीत फक्त दहा ते वीस रुपयांनी वाढ केली. देशातील शेतकºयांनी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून जर कृषी उत्पादनात हात अखडता घेतला तर देशभरात हाहाकार माजेल व जगात त्याचे परिणाम जाणवतील. त्यामुळे सरकारने शेतकºयांच्या शेतमालाच्या किमतीशी खेळ करू नये ते देशाला परवडणार नाही, असा इशाराही दिला.सरकार सत्तेवर आल्यावर सरसकट कर्जमाफी देणार होते, परंतु त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी गेला व त्यातही शेतकºयांना सरसकट कर्जमाफी न देता अटी, शर्ती टाकून कर्जमाफी नाकारली जात असून, खरिपासाठी दहा हजाराचे पीककर्ज देण्याचीही नुसतीच भूलथाप होती. त्यामुळे आता सरकारला जाब विचारण्याची वेळ आली असून राज्यात लागलेली आंदोलनाची आग देशपातळीवर दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, अशी घोषणा त्यांनी शेवटी केली.