दाऊदची प्रॉपर्टी घेऊ इच्छिणाऱ्या पत्रकाराला धमकी
By admin | Published: December 7, 2015 01:48 AM2015-12-07T01:48:02+5:302015-12-07T01:48:02+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तेच्या जाहीर लिलावामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करणारे ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तेच्या जाहीर लिलावामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करणारे ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कुख्यात गुंड छोटा शकिलकडून बोलत असल्याचे धमकी देणाऱ्याने सांगितल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, येत्या बुधवारी दाऊदच्या मुंबईतील विविध ठिकाणच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जाणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर फरार असलेल्या ‘मोस्ट वॉण्टेड’ दाऊदच्या मुंबई व देशभरातील मालमत्ता शासनाने ताब्यात घेतलेल्या आहेत. त्याची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करूनही दहशतीमुळे कोणी खरेदी करण्यास पुढे येत नाही. त्याचप्रमाणे अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याने आणि डी गँगचे हस्तक नातेवाईकांच्या माध्यमातून ही मालमत्ता विकत घेण्याचा प्रयत्न करीत असल्याने,
बरीच वर्षे ती पडून राहिलेली
आहे.
आता दक्षिण मुंबईतील पाखमोडिया स्ट्रीटजवळील दाऊद इब्राहिमच्या नावे असलेले दिल्ली जायका हे हॉटेल, तसेच घाटकोपर व माटुंगा येथील मालमत्ता विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली जायका हॉटेलचा जाहीर लिलाव येत्या बुुधवारी केला जाणार आहे. त्यासाठी किमान ३० लाखांपासून बोलीला सुरुवात केली जाणार आहे. साधारणपणे सव्वा कोटीपर्यंत त्याचा दर मिळावा, असे शासनाचे प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी या लिलावामध्ये सहभाग घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानंतर शुक्रवारी त्यांना छोटा शकिलच्या गुंडाकडून धमकी देणारा फोन आला. ‘लिलावात भाग घेतल्यास तुझा गेम करतो,’ असे धमकाविण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आपल्याला यापूर्वीही डी गँगकडून त्यांना धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतर पोलीस बंदोबस्त घेतल्यानंतर, सर्वसामान्य व सहजतेने वावरता येत नसल्याचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपण पोलीस बंदोबस्त घेणार नाही. त्याचप्रमाणे, लिलावातून माघारही घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही प्रॉपर्टी आपल्याला मिळाल्यास, त्याचा वापर सामाजिक कार्यासाठी
विशेषत: गरीब मुले आणि
महिलांच्या मदतीसाठी करण्याची प्रयत्न करू, असे बालाकृष्णन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)