श्रीपाल सबनीस यांना धमकीचं पत्र, पोलीस संरक्षणात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 12:10 PM2017-09-29T12:10:37+5:302017-09-29T12:12:45+5:30
माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना धमकीचे पत्र आल्याने त्यांच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. कार्यक्रमांच्या ठिकाणी जाताना त्यांच्याबरोबर
पुणे : माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना धमकीचे पत्र आल्याने त्यांच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. कार्यक्रमांच्या ठिकाणी जाताना त्यांच्याबरोबर तीन बंदूकधारी पोलीसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. यापूर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्याची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आली होती.
दहा-बारा दिवसांपूर्वी सबनीस यांना 'तुम्हाला पाकिस्तान दर महिन्याला ठराविक रक्कम पुरवत असल्याने तुम्ही मोघलांची बाजू मांडत आहात, हिंदू धर्माबाबत द्वेष पसरवत आहात. हे खपवून घेतले जाणार नाही.' अशा आशयाचे निनावी पोस्टकार्ड मिळाले. त्यावर स.प. महाविद्यालयजवळील पोस्टाचा शिक्का आहे.
काही दिवसांपूर्वी सबनीस यांनी मोघलांचा इतिहास पुस्तकातून वगळला जात असून सत्य इतिहास दडपून ठेवला जात असल्याची खंत व्यक्त केली होती. याबाबत सोशल मिडियावरूनही सबनीस यांच्यावर विखारी आणि अश्लील भाषेत टिका करण्यात आली होती. याबाबत सबनीस यांनी सायबर सेलकड़े तक्रार केली होती. त्यांनंतर हे पत्र आल्याचेही त्यांनी पोलिस प्रशासनाला कळवले तसेच पत्राची प्रतही दिली. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांशी सम्पर्क साधला. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
याबाबत 'लोकमत' शी बोलताना सबनीस म्हणाले, 'पत्रामधील मजकूर अत्यंत विखारी आणि धार्मिक विद्वेषातून लिहिण्यात आला आहे. मी मोगलांचा इतिहास वगळणे, गौरी लंकेश यांची हत्या याबाबत मांडलेली भूमिका अनेकाना पटलेली नाही. माझ्या तिसऱ्या भूमिकेला विरोध केला जात आहे. मी हिंदूविरोधी असल्याचेही वावटळ उठवले जात आहे. परंतु, मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. शुद्ध धर्माचा मी पुरस्कर्ता आहे. मात्र, धार्मिक कत्तलवादाला माझा विरोध आहे. चुकीच्या गोष्टिविरोधात मी कायम भूमिका माँडत राहीन. काही विद्वानांचे वलय कमी झाल्यानेही त्यांच्याकडून कळत नकळत माझ्याबद्दल विद्वेष पसरवला जात असण्याची शक्यता आहे.'