ऑनलाइन लोकमत
पाथरी, दि. 8 - गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास पाथरी तालुक्यातील गोपेगाव परिसरात घडली.
पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या ढालेगाव बंधाऱ्याच्या बॅक वॉटरचे पाणी गोपेगाव परिसरात आले आहे़ सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास गोपेगाव येथील आदित्य अमृत गिराम (११), ऋषीकेश अच्युत गिराम (१२), रामा ढगे (१०) ही तीन बालके या पाण्यात पोहण्यासाठी गेली होती.
पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर त्यांना फारसे पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडाले. या परिसरात कपडे धुणाऱ्या महिलांनी हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली़. यावेळी परिसरातील ग्रामस्थ जमेपर्यंत तिन्ही मुले पाण्यात बुडाली होती.
जवळपास २० मिनिटांनंतर या बालकांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर ते मृत झाल्याचे घोषित केले. या घटेनमुळे गोपेगाववर शोककळा पसरली आहे.