वीज कोसळून तिघांचा मृत्यू; शेतकऱ्यासह बालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 10:21 PM2021-07-06T22:21:18+5:302021-07-06T22:22:20+5:30
पावसाला अचानक सुरुवात झाल्याने शेतकरी, पोलीस पाटील, मजूर व गुराख्याने शेतातील झोपडीत आश्रय घेतला. त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट झोपडीवर कोसळली.
नागपूर (रामटेक) : पावसाला अचानक सुरुवात झाल्याने शेतकरी, पोलीस पाटील, मजूर व गुराख्याने शेतातील झोपडीत आश्रय घेतला. त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट झोपडीवर कोसळली. त्यामुळे होरपळलेल्या तिघांचा झोपडीतच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रामटेक शहरात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये पाेलीस पाटील, मजूर व गुराख्याचा तर जखमींमध्ये शेतकरी व १२ वर्षीय बालकाचा समावेश आहे. ही घटना चोरखुमारी (ता. रामटेक) शिवारात मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
योगेश अशोक कोकण (३०), मधुकर सावजी पंधराम (५५) दोघेही रा. चोरखुमारी, ता. रामटेक व दिलीप मंगल लांजेवार (४२, रा. डोंगरी, ता. रामटेक) अशी मृतांची नावे असून, जखमींमध्ये हरिसिंग धोंडबा सरोते व नेहाल रामसिंग कुमरे (१२) दोघेही रा. चोरखुमारी, ता. रामटेक यांचा समावेश आहे.
हरिसिंग सरोते यांची गावातगत शेती असून, त्यांनी पोलीस पाटील योगेश कोकण यांचा ट्रॅक्टर मशागतीसाठी किरायाने घेतला होता. दिलीप लांजेवार यांच्या शेतात कामाला होते तर मधुकर पंधराम व त्यांना नातू नेहाल शेतालगत त्यांच्या गाई चारत होते. दरम्यान, दुपारी ३ वाजताच्या सुमाराच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे या सर्वांनी शेतात असलेल्या झोपडीत आश्रय घेतला.
त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट झोपडीच्या मध्यभागी कोसळली. यात झोपडीतील सहाही जण होरपळल्याने गंभीर जखमी झाले. शिवाय, योगेश कोकण, मधुकर पंधराम व दिलीप लांजेवार यांचा झोपडीतच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. माहिती मिळताच देवलापार (ता. रामटेक) पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी तर तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. त्या दोघांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेमुळे चोरखुमारी गावात शोककळा पसरली होती. याप्रकरणी देवलापार पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.