एसटी कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले; राज्यभर आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 08:03 PM2020-09-30T20:03:57+5:302020-09-30T20:04:44+5:30
राज्य शासनाने येत्या ७ ऑक्टोंबरपर्यंत वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा..
बारामती: राज्यातील एसटी कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासुन वेतन रखडले आहे.त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने येत्या ७ ऑक्टोंबरपर्यंत वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा.अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे.
संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी याबाबत निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. त्यानुसार कोविड संकटाच्या काळात देखील एसटी कामगार जीवाची बाजी लावून करत आहेत.मात्र, गेल्या जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे प्रलबंति वेतन व सप्टेंबरचे देय वेतनासह तीन महिन्यांपासुन या कामगारांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे वेतनाअभावी सर्व कामगारांवर आर्थिक संकट ओढवले आहे.अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या ७ तारखेपर्यंत वेतनाबाबत मार्ग काढावा.अन्यथा ९ ऑक्टोबर रोजी राज्यभर विभागीय कार्यालयांसमोर आमरण उपोषण करू, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
वेतन कायद्यानुसार महामंडळाने वेळेवर वेतन देणे बंधनकारक आहे. निधी नसल्याचे कारण सांगून राज्य सरकार कडून महामंडळाकडून मदत मागितली आहे. परंतु या वेतनासाठी ती ही मिळेनाशी झालेली आहे. याबाबत संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच परिवहन मंत्र्यांसह प्रशासनाशी वेळोवेळी भेट घेऊन निवेदने दिली आहेत. त्यानंतर देखील वेतनाबाबत तोडगा निघालेला नाही. वेतन न मिळाल्यास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने राज्यभर विभागीय कार्यालयांसमोर आत्मक्लेश आमरण उपोषण केले जाणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
———————————