अप्पासाहेब पाटील / अमित सोमवंशीतुळजापूर, दि. 21 - तुळजापुरातील श्री तुळजाभवानी मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला. बुधवारी मध्यरात्रीपासून धार्मिक विधिला प्रारंभ झाला. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घटस्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.बुधवार व गुरुवारच्या मध्यरात्रीपासून नऊ दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली. रात्री १ वाजता श्री तुळजाभवानीची आठ दिवसीय मंचकी निद्रा उस्तव पार पडला. यानंतर मुर्तीची विधीवत् सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेवेळी विशेष पंचामृत अभिषेक करून नित्योपचार पंचामृत अभिषेक देवीस नैवेद्य, धुप-आरती व अंगारा झाल्यानंतर विशेषालंकार पूजेनंतर आरती करण्यात आली. यानंतर यजमान दांम्पत्याच्या हस्ते गोमुखावरुन सवाद्य घटकलश आणून त्याचे पूजन करीत दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सिंहगृहात जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. घटस्थापनेनंतर यजमानांच्या हस्ते ब्राम्हणवृंदास वर्णी देवून मंदिरात विविध धार्मिक ग्रंथाचे पठण केले जाणार आहे़दरम्यान, या उत्सवात देवीच्या दर्शनासाठी दूरदूरहून भाविक बुधवारी तुळजापुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे तुळजापूर नगरी गर्दीने फुलून गेली होती. शिवाय गावागावात सार्वजनिक मंडळाच्या वतीने साज-या होणा-या उत्सवासाठी तुळजापूर येथून भवानी ज्योत पेटवून नेली जाते. यासाठी बुधवारी रात्रीपासून नवरात्रौत्सव मंडळाचे पदाधिकारी तुळजापुरात दाखल होत होते. बुधवारी दिवसभरात हजारो कार्यकर्त्यांनी तुळजापुरातून भवानी ज्योत पेटवून नेली. बुधवारी रात्री पावसाने चांगलीच हजेरी लावली होती.