पुणे : तूरडाळीचे गगनाला भिडलेले भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले प्रयत्न पूर्णपणे फोल ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी १५५ रुपयांपर्यंत खाली आलेली तूरडाळ पुन्हा १७० रुपयांवर पोहोचली आहे. तसेच पुढील पंधरा दिवसांत नवीन तूरडाळीची आवक सुरू झाली तरी हे भाव सर्वसामान्यांच्या आटोक्यात येण्यासाठी नवीन वर्ष उजाडावे लागणार आहे. तूरडाळीचे भाव प्रतिकिलो २०० रुपयांच्या पुढे गेल्यानंतर राज्य सरकारने ही भाववाढ रोखण्यासाठी साठेबाजांवर कारवाई सुरू केली. साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला. तसेच जप्त केलेली डाळ प्रति किलो १०० रुपये भावाने खुल्या बाजारात आणण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र, या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. त्यावेळी घाऊक बाजारात तूरडाळीचे भाव १५५ ते १६० रुपयांपर्यंत खाली आले. पण मागील दोन आठवड्यांत हे भाव प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी वाढले आहेत. सध्या तूरडाळीचे भाव क्लिंटलमागे १२००० ते १७००० रुपये एवढे आहेत. किरकोळ बाजारात हे भाव अधिक आहेत.पुढील पंधरा दिवसांत तूरडाळीचा नवीन हंगाम सुरू होत आहे. बार्शी, लातूर, अकोला, विदर्भ, उदगीर, बेळगाव या भागातून ही डाळ बाजारात येईल. मात्र, सध्याचे चढे भाव पाहता नवीन माल बाजारात येऊनही त्यामध्ये फारसा बदल होण्याची चिन्हे नाहीत. नवीन आवक सुरू झाल्यानंतर त्याचे प्रमाण कमी असते. साधारण महिन्याभरात आवक वाढल्यानंतर भाव कमी व्हायला सुरुवात होईल, असे डाळीचे व्यापारी विजय राठोड यांनी सांगितले. सध्यातरी भाव कमी होण्याचे चिन्हे नसल्याने सर्वसामान्यांकडून तूरडाळीची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे तूरडाळीला तितकासा उठाव नाही. परिणामी नवीन तूरडाळीची व्यापाऱ्यांकडून मोठी खरेदी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नवीन तूरडाळीलाही लगेचच फारसा प्रतिसाद मिळणार नाही, असे व्यापाऱ्यांनी नमूद केले.
तूरडाळीचे वरण आवाक्याबाहेरच
By admin | Published: December 07, 2015 12:24 AM