मुंबई : शासकीय कामकाजात गती व पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वच विभागाकडून केला जात आहे. तथापि, अन्य विभागांच्या तुलनेत काहीसे मागे असलेल्या गृहखात्यातील परिवहन विभागाचा कारभारही आता लवकरच ‘हायटेक’ होण्याची चिन्हे आहेत. माहिती व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी (इ-गव्हर्नन्स) या विभागात आता के.पी.एम.जी.प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सेवा हमी कायद्यांतर्गत या विभागाकडून देण्यात सेवा आॅनलाइन करणे, अन्य विभागाशी माहितीची आदानप्रदान करणे आदी प्रमुख कामासाठी ही कंपनी विभागाला मार्गदर्शन करणार आहे. या प्रकल्पासाठी एका वरिष्ठ सल्लागारासह एकूण तीन तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कंपनीची एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात आल्याचे विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. परिवहन विभागातील विविध सेवा जनतेला आॅनलाइन उपलब्ध व्हाव्यात, त्यासाठी सल्लागारासाठी निविदा मागविण्यात आली होती. त्यात पात्र ठरलेल्या पाच कंपन्यांना अंतिम सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याबाबत अप्पर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीसमोर गेल्या २४ नोव्हेंबरला झालेल्या सादरीकरणात ४ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यापैकी के.पी.एम.जी. प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची एका वर्षासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
परिवहन विभाग होणार ‘हायटेक’
By admin | Published: January 04, 2016 2:39 AM