अनगाव : भिवंडी तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या वाढत असून तिघा बालकांना उपचारासाठी भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गवई यांनी दिली.भिवंडी पंचायत समितीचा आरोग्य विभाग व पिळझे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या देपोली गावातील मोनिका प्रकाश वाघ (३ किलो ८ ग्रॅम), रोहित प्रकाश वाघ (३ किलो १०० ग्रॅम) या दोघा १० महिन्यांच्या जुळ्या भावंडांना व धामणगाव ग्रामपंचायतीच्या धापसीपाडा येथील अडीच वर्षांच्या सुप्रिया राम पागी (४ किलो) या कुपोषित बालकांवर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहित हा अतिकुपोषित श्रेणीत मोडत असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह एकात्मिक बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. ‘एक दिवस मजुरां’सोबत या कवाड येथे झालेल्या कार्यक्रमात ११७ कुपोषित बालकांवर त्वरित उपचार करा, त्यांची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेऊन तालुका कुपोषणमुक्त करा, असा आदेश जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिला होता. त्या आदेशाचे पालन झाले नसल्याचे हे एक उदाहरण असल्याची चर्चा आहे.पालघर जिल्ह्यात कुपोषणाने ६०० बालकांचा बळी गेला आहे. त्याची पुनरावृत्ती ठाणे जिल्ह्यात होऊ नये, यासाठी आदिवासी विभागाने उपाययोजना करणे आवश्यक आहेत. अंगणवाडीमध्ये मुलांना सकस आहार न मिळाल्याने ती कुपोषित होत असल्याची माहिती पालकांनी दिली. तालुक्यात श्रमजीवी संघटनेच्या वतीने अशा मुलांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यामध्ये ही बालके आढळल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष अशोक सापटे यांनी दिली. (वार्ताहर)अनगाव आरोग्य केंद्रामधून ही कुपोषित बालके उपचारासाठी दाखल केली आहेत. योग्य प्रकारे उपचार सुरू आहे. - डॉ. अनिल थोरात, अधीक्षक, इंदिरा गांधी रुग्णालय
कुपोषित मुलांवर उपचार
By admin | Published: October 27, 2016 1:49 AM