ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यातील मजार-ए-शरीफ येथे दर्शनावर महिलांना असलेली बंदी उच्च न्यायालयाने हटवल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई रविवारी दुपारी हाजी अली दर्ग्यात पोहोचल्या. मात्र त्यांनी न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केले नाही.
आता दर्ग्यात महिलांना जेवढया परिसरात प्रवेशाची परवानगी आहे तेवढयाच भागात त्यांचा वावर होता. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने मजार-ए-शरीफ येथे दर्शनावर महिलांना असलेली बंदी घटनाबाह्य ठरवत दर्शनाचा मार्ग मोकळा केला.
मात्र, हाजी अली दर्ग्याच्या विश्वस्त मंडळाला या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे असल्याने उच्च न्यायालयाने या आदेशाला सहा आठवड्यांची स्थगिती दिली. त्यामुळे महिलांना मजार-ए-शरीफ दर्शनासाठी खुले झालेले नाही. शनी शिंगणापूर येथे महिलांच्या प्रवेशाचा लढा यशस्वी केल्यानंतर तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेशाचे आंदोलन हाती घेतले होते.
Really happy that no one objected us from entering Haji Ali Dargah, so many Muslim women supported us: Trupti desai pic.twitter.com/qWeABJSaOc— ANI (@ANI_news) August 28, 2016