तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2016 12:40 PM2016-10-25T12:40:13+5:302016-10-25T12:51:30+5:30

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. 105 विरुद्ध 6 मतांनी हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

Tukaram's motion against the non-confidence motion | तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर

तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 25 - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. 105 विरुद्ध  6 मतांनी हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्षांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं तर भाजपाने प्रस्तावाला विरोध केला. यावेळी सभागृहात मुंढे हटावच्या घोषणाही देण्यात आल्या. अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती.
 
रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेमध्ये आयुक्तांवरील पहिला अविश्वास ठराव मंगळवारी मांडण्यात आला. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापौरांसह नगरसेवकांना अवमानजनक वागणूक देणे, मनमानी कारभाराचा ठपका ठेवण्यात आला होता. 
 
(तुकाराम मुंढे जाणार की राहणार?) 
 
नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना १९९२ मध्ये झाली. रौप्य महोत्सवी वाटचाल सुरू असलेल्या पालिकेच्या वाटचालीमध्ये २० वे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची मे २०१६ मध्ये नियुक्ती झाली. पहिल्या दिवसापासून मुंढे हे प्रसिद्धीच्या झोतात राहिले. शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, पालिकेतील बेशिस्तपणा मोडीत काढला पण त्यांचा दरारा वाटण्याऐवजी भीती वाटू लागली. नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार यांच्याशी संवाद न ठेवण्याच्या स्वभावामुळे त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली. गरजेपोटी बांधलेल्या घरांवरील कारवाई, मार्जिनल स्पेस, एपीएमसीमधील कारवाई यामुळे अनेक समाजघटक दुखावले व त्याचा परिणाम म्हणून त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. अविश्वास ठरावासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केल्यापासून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महापालिकेमधील भ्रष्टाचाराविषयी वृत्त प्रसिद्ध होवू लागले.
 
मुंढे २५ नगरसेवकांचे पद रद्द करणार असल्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला जात असल्याचे बोलले जावू लागले. महापालिकेची बदनामी सुरू झाल्यामुळे शहरवासीयांमध्ये नाराजी निर्माण झाली. मुंढे यांच्या समर्थनासाठी सोशल मीडियामधून मोहीम सुरू झाली. पालिकेमधील १ लाख कोटी रूपयांचा भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी ठराव मांडला जात असल्याचे वातावरण निर्माण होवू लागले. यामुळे नाराज झालेल्या सर्वपक्षीय नागरिकांनी आयुक्तांच्या विरोधात मोहीम सुरू केली. यामुळे मुंढे समर्थक व विरोधक यांच्यामध्ये सोशल मीडियामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले.
 
महापौर बंगल्यावर १७ मे रोजी सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक झाली व तेव्हापासून आयुक्त हटाव मोहिमेने गती घेतली. स्थायी समिती सदस्यांनी अविश्वास ठरावासाठी विशेष सर्वसाधारण सभेची मागणी केली आहे. अविश्वास ठरावावरून शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. पण शिवसेनेने सर्व नगरसेवकांना व्हिप जारी केल्यामुळे मतभेद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंतिम निर्णय माझाच असेल असे घोषित केल्यामुळे सेनेत दुफळी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक यांनीही शहराच्या हितासाठी मुंढे हटाव मोहिमेस पाठिंबा देवून स्वत: नगरसेवकांशी संवाद साधला होता.
 
जमावबंदी आदेश जारी
सोशल मीडियामधून मुंढे समर्थक व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. मंगळवारी मुख्यालयामध्ये व मुख्यालयाबाहेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी आदेश जारी केला आहे. मुख्यालयाच्या १०० मीटरपर्यंत कोणालाही गर्दी करता येणार नाही. याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

Web Title: Tukaram's motion against the non-confidence motion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.