भारनियमन बंद करा; अन्यथा आंदोलन - विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 05:04 AM2017-09-15T05:04:42+5:302017-09-15T05:04:57+5:30
राज्य सरकारने आठ दिवसांच्या आत भारनियमन बंद करावे. अन्यथा सरकारविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मुंबई : राज्य सरकारने आठ दिवसांच्या आत भारनियमन बंद करावे. अन्यथा सरकारविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
विखे पाटील यांनी राज्यातील भारनियमनासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, मागील ५ दिवसांपासून संपूर्ण राज्यात रोज ६ ते १२ तासांपर्यंत भारनियमन होते आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असताना व राज्याच्या अनेक भागांत पावसानंतर रोगराई पसरण्याची भीती असताना हे भारनियमन सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असून, राज्यात आंदोलनेही सुरू झाली आहेत.
कोळशाच्या टंचाईमुळे औष्णिक वीजनिर्मिती संच बंद पडले असून, राज्याला १ ते १.५ हजार मेगावॅटचा तुटवडा जाणवतो आहे. महानिर्मिती कंपनीने कोळशाचा किमान १५ दिवसांचा साठा करण्याच्या बंधनाकडे दुर्लक्ष केल्याने ही गंभीर परिस्थिती आहे. भारनियमनाचे हे संकट प्रशासकीय निष्काळजीचा परिणाम असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले.
व्यापार मंदावला
सध्या कृषी क्षेत्राकडून आणि अन्य ग्राहकांचीही विजेची मागणी वाढली आहे. विजेअभावी कृषिपंप बंद पडून शेतीला पाणी देणे अशक्य झाले आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रियाही बाधित झाली आहे. राज्याच्या अनेक प्रमुख एमआयडीसींसह असंख्य उद्योग-लघुउद्योगांमधील उत्पादन प्रभावित झाले आहे. भारनियमनाचा बाजारपेठेवर प्रतिकूल परिणाम होऊन व्यापार मंदावला आहे.