विजय चौगुले अडचणीत
By admin | Published: December 19, 2014 04:37 AM2014-12-19T04:37:33+5:302014-12-19T04:37:33+5:30
शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्यावर युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
नवी मुंबई : शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्यावर युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पीडित महिलेवर पाळत ठेवल्याप्रकरणी तानाजी सुर्वेवरही गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पीडित महिलेने विजय चौगुले यांच्याविरोधात नवी मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करून बुधवारी रात्री सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौगुले यांनी मागील काही वर्षांपासून धमकावून लोणावळा, सातारा व इतर ठिकाणी नेऊन अतिप्रसंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माझ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तानाजी सुर्वे याच्यावर सोपविण्यात आल्याचाही तक्रारीत उल्लेख केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी सुर्वे याला तत्काळ अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
चौगुलेविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीरा बनसोडे यांनी स्वत: चौगुले यांच्या निवासस्थानी जाऊन झडती घेतली. परंतु चौगुले सापडले नाहीत. रात्री उशिरापर्यंत त्यांना अटक करण्यात आली नव्हती. परंतु कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते, असे बोलले जात आहे.
याविषयी बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेवर लक्ष ठेवणाऱ्यास अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)