मुंबई - लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मिळण्याबाबत शिवसेनेने प्रस्ताव दिला होता. पण त्यावेळी याविषयावर माझ्यासमोर कोणताही निर्णय झाला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानी आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना दिली.
याविषयावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली असल्यास त्याची माहिती फक्त त्यांनाच असून फक्त तेच या विषयावर निर्णय घेऊ शकतात, असेही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री पदावरून सध्या भाजप आणि शिवसेनेत चांगलीच ओढतान सुरू झाली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे शिवसेनेने आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यातच काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे भाजपसमोर देखील सत्ता पुन्हा मिळविण्याचा पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्रीपदावरून उभय पक्षात जुगलबंदी सुरू झाली आहे.