कवठेमहांकाळ /आटपाडी : विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रातही पसरू लागले आहे. आज, बुधवारी एकाचदिवशी सांगली जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी येथील प्रकाश जाधव या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून गळफास लावून घेतला, तर आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील डाळिंब बागायतदार विलास गायकवाड यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.बनेवाडी येथील प्रकाश विठोबा जाधव (वय ४०) या शेतकऱ्याने आज, बुधवारी कर्जाला कंटाळून घरी गळफास लावून आत्महत्या केली. मृत प्रकाश जाधव मूळचे कर्नाटकातील अथणी तालुक्यातील कात्राळ या गावचे असून, लहानपणापासूनच ते मामाकडे बनेवाडी या गावी राहत होते. त्यांचे मामा हरी शिंदे सैन्यात अधिकारी असून, त्यांनी जाधव यांच्या नावे दोन एकर जमीन करून दिली होती. त्या दोन एकरामध्ये प्रकाश जाधव यांनी द्राक्षे, डाळिंब आणि ऊस लावला आहे. या पिकांवर बँकेचे व विकास सोसायटीचे कर्ज काढले आहे. कर्जाची रक्कम चार लाखांच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले. द्राक्ष आणि डाळिंब बागेवर जाधव यांनी मोठा खर्च केला होता, मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्यात बाग सापडली. रोगांनी पूर्ण बागच वाया गेल्याने ते चिंतेत होते. बँकेने आणि सोसायटीने कर्जफेडीबाबत त्यांच्याकडे विचारणा सुरू केली होती. या कर्जाला कंटाळूनच जाधव यांनी घरी तुळईला गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.शेटफळेतील डाळिंब बागायतदाराची नैराश्यातून आत्महत्या दुसरी आत्महत्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे घडली. ज्या डाळिंबाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना लखपती होण्याचे स्वप्न दाखविले, ते डाळिंब यंदा उत्पादन खर्चाएवढंही उत्पन्न देऊ न शकल्याने आज शेटफळे येथील विलास ज्ञानू गायकवाड (वय ४२) या तरुण शेतकऱ्याने त्याच्या डाळिंबाच्या बागेतच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. कृषीविषयक पदव्युत्तर शिक्षण (एमएस्सी अॅग्री) घेऊन राहुरीला कृषी विद्यापीठात काही वर्षे प्राध्यापक म्हणून विलास गायकवाड नोकरी करीत होते.पाच वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडून शेटफळे येथे अत्याधुनिक पध्दतीने शेती करण्याचे ठरवून गाव गाठले. त्यांची डाळिंबाची २०० झाडे आहेत. सध्या तालुक्यात सर्वच शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागांवर कमी-अधिक प्रमाणात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आहे. विलास गायकवाड यांच्या बागेवरही तेल्याने विळखा घातला आहे. तेल्या रोगावर मात करण्यासाठी लाखो रुपये खर्चून महागडी कीडनाशके आणि बुरशीनाशके फवारून बाग यशस्वी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही.तेल्याचा प्रादुर्भाव झाल्याने डाळिंबाची फळे उलली. अशी उललेली फळे सध्या आटपाडीतील डाळिंबाच्या सौद्यात खरेदी केली जात नाहीत. अशी फळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणली, तरी ती व्यापारी नाकारतात. त्यामुळे शेतकऱ्यांना डाळिंबे फेकून द्यावी लागत आहेत. एवढा खर्च करूनही डाळिंबाच्या बागेत अपयश आल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली.काल (मंगळवारी) रात्री कुणास काही न सांगता विलास घरातून निघून गेले. त्यांचा मोबाईलही सायंकाळी चार वाजल्यानंतर बंद होता. आज सकाळी चंद्रभान गायकवाड यांना जनावरे घेऊन शेतात गेल्यावर त्यांचा मृतदेह दिसला. याबाबत विलास यांचे चुलत बंधू पोपट कृष्णा गायकवाड यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार ए. के. भवारी करीत आहेत.आधुनिक शास्त्राने शेती करून फायद्याची शेती करण्यासाठी विलासने डाळिंबाची बाग लावली. शेतातील एवढे शिक्षण घेऊन आणि आटोकाट प्रयत्न करूनही अपयश आल्याने त्याने मृत्यूला कवटाळले. डाळिंबानेच माझ्या भावाचा बळी घेतला.- पोपट गायकवाड, शेटफळे
जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: January 15, 2015 12:15 AM