औरंगाबाद : भामरागडसारख्या भागात काम करताना आदिवासी लोकांना समाजाच्या प्रवाहात आणताना वन्य प्राण्यांसाठीही काम केले. अनेक वर्षांत वन्यप्राणी स्वत:हून मानवावर हल्ला करतो, असे कधीच दिसले नाही; परंतु आज वन्यप्राणी हिंसक होत असल्याचे सांगत त्यांना मारले जात आहे. अवनी वाघिणीच्या जीवावर लोक उठले. मात्र, कोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच (मनुष्य) सर्वात धोकादायक असल्याचे समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे म्हणाले. औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे गुरुवारी देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीजच्या सभागृहात आयोजित ‘रेअर शेअर’ कार्यक्रमात ते बोलत होते.डॉ. आमटे यांनी आपल्या व्याख्यानाच्या शेवटी अवनीच्या मृत्यूसंदर्भात आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी राज्य सरकार किंवा वन विभागाचे नाव घेतले नाही. मात्र, अप्रत्यक्षपणे अवनी वाघिणीला ठार केल्याच्या घटनेचा विरोध केला. आपल्या कार्याविषयी बोलताना ते म्हणाले की, आदिवासी लोकांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांचा, त्यासाठी आलेल्या अनेक अडचणींचा संपूर्ण जीवन प्रवास मांडला. एका कुष्ठरोग्याला पाहून बाबांनी (बाबा आमटे) यांनी संपूर्ण जीवन त्यांच्या सेवेसाठी दिले. लहानपणी कुष्ठरोगी आमचे सोबती होते. बाबांचे काम समाजाने स्वीकारले. तेव्हा त्यांच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भामरागडच्या जंगलातील आदिवासी लोकांच्या उन्नतीसाठी काम करण्याचे ठरवले. मंदाकिनीसोबत आनंदवनमध्ये विवाह झाला आणि दुसऱ्याच दिवशी भामरागड येथे गेलो. समाजकार्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मंदाकिनी कामात साथ देण्यावर ठाम राहिली.आदिवासी आजारपणात मांत्रिकाकडे जात. अशक्य गोष्टी मांत्रिक देवावर सोडून देत असे. अशांना बरे केल्यानंतर लोकांचा विश्वास झाला. प्रसूती, मोडलेल्या हाडांचे उपचार, डोळ्यांवर उपचार, मुलांसाठी शाळा, शेतीविषयी मार्गदर्शन केले. आज तेथील अनेक मुले वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्चपदावर पोहोचले. निरपेक्ष सेवेचा आनंद घेतला. लोकांनी उंचीवर नेले; परंतु जमिनीवर पाय घट्ट रोवलेले आहेत, असेही डॉ. प्रकाश आमटे म्हणाले.
‘अवनी’च्या जीवावर उठलेला दोन पायांचा प्राणीच धोकादायक- प्रकाश आमटे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 5:24 AM