शिंदे गटाचे दोन, राष्ट्रवादीचे एक, केंद्रातले एक मंत्री, तरीही आदिवासी महिलेची झाली भर रस्त्यात प्रसूती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 07:09 AM2023-08-09T07:09:07+5:302023-08-09T07:09:24+5:30
रुग्णवाहिका पोहोचली नाही, खड्ड्यांमुळे ओढावला दुर्दैवी प्रसंग
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात शिंदे गटाचे उदय सामंत, दीपक केसरकर हे दोन मंत्री, राष्ट्रवादीकडे तर आदिती तटकरे या महिला मंत्री, नारायण राणे यांच्यासारखे एक मोठे केंद्रीय मंत्री असतानाही कोकणातल्या अलिबाग तालुक्यात आदिवासी वाडीतील गर्भवती महिलेची भर रस्त्यात प्रसूती करण्याची नामुष्की आली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली. देश १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील गारभाट खुटगाईन या अदिवासी वाडीतील गर्भवती महिलेवर हा दुर्देवी प्रसंग ओढावला.
नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा देत असल्याचा दावा शिंदे सरकार करत असले तरी आदिवासी वाडीवरील रस्त्याची परिस्थिती विदारक आहे. अलिबाग तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीत डोंगर भागात गारभाट खुटगाईन ही आदिवासी वाडी आहे.
अदिवासीवाडीतील यशोदा गणपत केवारी ही सात महिन्यांची गर्भवती होती. ७ ऑगस्ट रोजी तिच्या पोटात दुखू लागले. या वाडीवर जाणारा रस्ता हा खड्डेयुक्त असल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती. अखेर या महिलेला घेऊन तिचे नातलग एका छोट्या टेम्पोतून हॉस्पिटलमध्ये जात होते. मात्र, गाडीत मोठ्या प्रमाणात गचके बसू लागले. त्यामुळे यशोदाच्या वेदना वाढू लागल्या. तिच्या या अवस्थेमुळे नातलग भयभीत झाले. अखेर रस्त्याच्या बाजूला टेम्पो थांबवावा लागला. आजूबाजूच्या महिला धावून आल्या. अखेर रस्त्यातच यशोदेने बाळाला जन्म दिला.
मात्र, या घटनेमुळे नातलग आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. संतप्त महिलेच्या कुटुंबीयांनी पंचायत व आरोग्य विभागाला याबाबत जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे वाट्याला आले, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
कुर्डूस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी पुढील सोपस्कार केले. यशोदा आणि तिचे बाळ सुखरूप आहेत.
महिलेला सातव्या महिन्यांपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जात होते. ४ ऑगस्ट रोजीही ती तपासणी करून गेली होती. तिची प्रसूतीची वेळ पुढील दोन महिन्यांनी होती. मात्र, वेळेआधीच तिची प्रसूती झाली. सदर वाडीवर रुग्णवाहिका जाण्यास रस्ता नसल्याने तिला छोट्या टेम्पोतून आणले जात होते. तिची प्रसूती झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करून घेत योग्य ते उपचार केले जात आहेत.
- डॉ. मनीषा विखे,
जिल्हा आरोग्य अधिकारी