राणे कुटुंबाची दोन पिढ्यांची तपश्चर्या
By admin | Published: May 11, 2015 03:42 AM2015-05-11T03:42:01+5:302015-05-11T03:42:01+5:30
भावाला वीरमरण आल्याचा कुटुंबाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया शहीद संजय राणे यांचे थोरले भाऊ आणि प्रमुख अग्निशामक सुनील राणे यांनी व्यक्त केली.
चेतन ननावरे, मुंबई
भावाला वीरमरण आल्याचा कुटुंबाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया शहीद संजय राणे यांचे थोरले भाऊ आणि प्रमुख अग्निशामक सुनील राणे यांनी व्यक्त केली. मुंबईकरांच्या संरक्षणासाठी स्वत:ही शहीद होण्याची तयारी राणे यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे राणे यांच्या जाण्याने कुटुंबाला ४० दिवसांत दुसरा धक्का बसला आहे. ३१ मार्च रोजी राणे यांच्या आईचे निधन झाले होते. त्या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच राणे यांना वीरमरण आल्याने राणे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राणे यांचे थोरले भाऊ सुनील राणे अग्निशमन दलाच्या विलेपार्ले केंद्रात प्रमुख अग्निशामक म्हणून कार्यरत आहेत.
‘लोकमत’ला दिलेल्या प्रतिक्रियेत सुनील राणे म्हणाले, ‘वडिलांनीही अग्निशमन दलामध्ये अधिकारी पदावर राहून मुंबईकरांची सेवा केली आहे. त्यांच्यामुळेच आम्हा दोघा भावांनाही दलाची सेवा करण्याची संधी मिळाली. आपल्या मुलानेही दलामध्ये अधिकारी व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे मी स्वत: दलामध्ये अग्निशामक म्हणून भरती झालो. मात्र अधिकारी होता आले नाही. म्हणून लहान भाऊ संजयने परीक्षा देऊन अग्निशमन दलामध्ये अधिकारी पदावर भरती झाला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान एकत्र काम केल्याचा अभिमान आहे. आज संजयला वीरमरण आल्याने कुटुंबाची मान अधिकच उंचावली आहे.
कोणत्याही मदतीची गरज नाही : नियमानुसार जी मदत मिळेल, ती स्वीकारू; मात्र कोणाकडेही मदत मागणार नाही, अशी प्रतिक्रियाही राणे यांनी व्यक्त केली आहे. भावाने दिलेले बलिदान हे मुंबईकरांच्या संरक्षणासाठी होते. त्यामुळे मुंबईकरांना जेव्हा-जेव्हा गरज असेल, तेव्हा-तेव्हा राणे कुटुंब असे बलिदान देण्यास तप्तर असेल, असेही त्यांनी सांगितले.
ठोस उपाययोजना राबवण्याची गरज
अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक स्वायत्त संस्था, भाडेकरू आणि विकासकांना एकत्र घेऊन विकासाचे धोरण तयार करण्याची गरज खासदार अरविंद सावंत यांनी या वेळी व्यक्त केली. लालबाग, परळ, गिरगाव येथील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून तत्काळ त्यांचे पुनर्वसन आणि पुनर्विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही सावंत यांनी दिले.
कामगार संघटनांची मदतीसाठी धाव
म्युनिसिपल मजदूर युनियनने लवकरच बैठक घेऊन आर्थिक मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले; तर शिवसेना प्रणीत मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने पालिका दरबारी करावा लागणारा सर्व पत्रव्यवहार तत्काळ करून मदतनिधी मिळवून देण्याची तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्यासाठी पालिकेवर दबाव टाकावा असे सांगितले.
भावाचे अंत्यदर्शन झालेच नाही!
च्संजय राणे यांचे सर्वांत मोठे भाऊ नारायण काही कामानिमित्त बाहेरगावी होते. लहान भावाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांनी तत्काळ मुंबईकडे धाव घेतली.
च्मुंबईला पोहोचण्यासाठी त्यांना दुपारचा १ वाजणार होता. मात्र आगीने
९० टक्क्यांहून अधिक भाजल्याने राणे यांच्या पार्थिवावर लवकर अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. अन्यथा संसर्ग होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. परिणामी, वेळ आणि परिस्थितीमुळे भावाचे अखेरचे दर्शन घेण्याची इच्छाही अपूर्णच राहिली.