मुंबई : इमान अहमद ही सैफी रुग्णालयात दाखल झाल्यापासून तिला दोन पक्षाघाताचे झटके आले. मात्र, तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. दोन वर्षांपूर्वीही तिला पक्षाघाताचा झटका आला होता, त्या वेळी तिच्या उजव्या बाजूवर त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे आजही तिच्या उजव्या बाजूला काही प्रमाणात त्रास उद्भवतो, अशी माहिती प्रशासनाने दिली.मागच्या काही दिवसांपासून इमानच्या रक्तदाबाची पातळी वाढत होती. मात्र, आता रक्तदाब नियंत्रणात आल्याने तिची प्रकृती सुधारत आहे. आहार आणि उपचारांसोबतच इमान नियमितपणे फिजिओथेरपीचे सेशन करते आहे, त्यात सध्या मेदाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी प्राधान्याने व्यायाम सुरू आहे. यानंतरच्या टप्प्यात आणखी काही कठीण फिजिओथेरपीचे प्रकार इमानला दिले जाणार असल्याची माहिती डॉ. कमलेश बोहरा यांनी दिली.इमानच्या हृदयाच्या कार्याचेही काळजीपूर्वक निरीक्षण सुरू आहे, जेणेकरून हृदयात कोणत्याही गाठी होता कामा नयेत, याकडे डॉक्टरांचे लक्ष आहे. सध्या जवळपास इमानने एकूण ५० किलो वजन घटविले आहे. यानंतर, आणखी २० वा ३० किलो वजन दोन आठवड्यांत घटविण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर आहे. इमानला अतिलठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, थायरॉइड यांसारखे अनेक आजार आहेत. इमानच्या शस्त्रक्रियेसाठी आणि शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या उपचारांसाठी ‘बिटगिव्हिंग’ या साइट्सच्या माध्यमातून क्राउडफंडिंगद्वारे निधी उभारण्यात येत आहे. याकरिता, १ कोटींचा निधी लागणार असून, आतापर्यंत २० लाख रुपये जमा झाले आहेत. अधिक निधी जमवण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. (प्रतिनिधी)>दोन आठवड्यात तीस किलो वजन घटवणारतब्बल २५ वर्षांनंतर बेरिअॅट्रिक सर्जरीसाठी इमान इजिप्तहून भारतात दाखल होण्यासाठी घराबाहेर पडली. चर्नीरोडच्या सैफी रुग्णालयात इमानसाठी वन बेड हॉस्पिटल बांधण्यात आले आहे. इजिप्तमध्ये राहणाऱ्या इमानचे वजन ५०० किलो असल्याने, ती जगातील सर्वाधिक वजन असलेली महिला आहे. केवळ ३६ वर्षांची असलेल्या इमानला प्रचंड वजनामुळे घराबाहेर पडता आलेले नाही. वयाच्या पंचविशीपासून ती घरातच आहे. तिला साधे अंथरुणावरून हलताही येत नाही. अवाढव्य आकारामुळे दैनंदिन हालचाली करणेही तिला कठीण होते. इमान दैनंदिन व्यवहारासाठी पूर्णपणे आईसह बहिणीवर अवलंबून राहते. जन्माच्या वेळी तिचे वजन ५ किलो होते.
इमानला दोन पक्षाघाताचे झटके
By admin | Published: March 06, 2017 5:48 AM