दोघा सरपंचांसह पाच जणांवर होणार फौजदारी दाखल
By admin | Published: May 7, 2014 01:30 AM2014-05-07T01:30:36+5:302014-05-07T01:48:36+5:30
सुमारे १७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन दोघा सरपंच व दोघा ग्रामसेवकांसह विस्तार अधिकारी यांच्यावर दोन दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी बागलाणच्या गटविकास अधिकारी श्रीमती कोदे यांना दिले आहेत.
तिळवणला १७ लाखांचा अपहार : सुखदेव बनकर यांचे गटविकास अधिकार्यांना आदेश
नाशिक : बागलाण तालुक्यातील तिळवण येथील हरियाली कार्यक्रमांतर्गत पाणलोट विकास व वृक्ष लागवडीत सुमारे १७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन दोघा सरपंच व दोघा ग्रामसेवकांसह विस्तार अधिकारी यांच्यावर दोन दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी बागलाणच्या गटविकास अधिकारी श्रीमती कोदे यांना दिले आहेत.
यासंदर्भात १५ मार्च २०१४ रोजीच गटविकास अधिकार्यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून झालेल्या अपहाराची रक्कम पंचायत समितीकडे भरण्याचे पत्र दिले होते. मात्र दोन महिने उलटूनही यासंदर्भात नोटिसींना साधे उत्तरही देण्याचे सौजन्य या लोकप्रतिनिधी व अधिकार्यांनी दाखविलेले नाही. १५ मार्च २०१४ च्या पत्रानुसार हरियाली पाणलोट विकास कार्यक्रमात तत्कालीन सरंपच वसंतराव गुंजाळ, ग्रामसेवक ए. ए. ठोक व विस्तार अधिकारी ए. के. गोपाळ यांच्यावर प्रत्येकी चार लाख ९५ हजार ५६८ रुपयांची वसुली दाखविण्यात आली असून, वृक्ष लागवडीत सरपंच इंदूबाई जगताप, ग्रामसेवक व विस्तार अधिकारी ए. के. गोपाळ यांच्यावर प्रत्येकी ७५ हजारांची वसुली दाखविण्यात आली आहे. मंगळवारी संबंधित तक्रारदाराने मुख्य कार्यकारी अधिकार्यांची भेट घेऊन या अपहार प्रकरणी दोेन महिने उलटूनही काहीही कारवाई होत नसल्याची तक्रार करताच मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी बागलाणच्या गटविकास अधिकारी श्रीमती कोदे यांना दोन दिवसांत या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)