दुचाकी चोरणाऱ्या चौकडीला अटक
By Admin | Published: August 2, 2016 02:19 AM2016-08-02T02:19:19+5:302016-08-02T02:19:19+5:30
एपीएमसी पोलिसांनी दुचाकी चोरीप्रकरणी तिघांना पुणे येथून अटक केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी दुचाकी चोरीप्रकरणी तिघांना पुणे येथून अटक केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. त्यांनी मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातून चोरलेल्या १७ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
वापरलेली दुचाकी खरेदीच्या व्यवहारातून प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी दुचाकीचोर टोळीला अटक केली आहे. रोहित बेहडे यांनी अक्षय आतकरी याच्याकडून जुनी दुचाकी खरेदी केली होती. परंतु आतकरी हा त्यांना गाडीचे आवश्यक मूळ पेपर देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे संशय आल्यामुळे बेहडे यांनी एपीएमसी पोलिसांकडे यासंबंधी तक्रार केली होती. उपआयुक्त प्रशांत खैरे, सहाय्यक आयुक्त दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र गलांडे, निरीक्षक प्रमोद रोमण यांच्या पथकाने तपासाला सुरवात केली होती. तपासादरम्यान अक्षय उत्तम आतकरी याचा फोटो व मोबाइल नंबर पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक उध्दव डमाळे, उपनिरीक्षक सुनील तारमाळे व पोलीस शिपाई सचिन ठोंबरे, लहू भोसले, अनिल चव्हाण, विजय पाटील यांच्या पथकाने बनावट ग्राहकाद्वारे कल्याण स्थानकात बोलावून आतकरीला ताब्यात घेण्यात आले होते. ताब्यात घेतल्यानंतर त्याने इतर साथीदारांची माहिती दिली. त्यानुसार जुन्नर परिसरात सापळा रचून इतर तिघांना अटक करण्यात आली. त्यापैकी एक जण अल्पवयीन असून उर्वरित दोघांची अभिजित तांबे (२३), गणेश खिल्लारी (२७) अशी नावे आहेत.
तपास पथकाने १७ दुचाकी जप्त केल्या आहेत. चोरीच्या दुचाकींमध्ये २ बजाज डिस्कव्हर तर १ स्प्लेंडर व इतर १४ पल्सर आहेत. पल्सरच्या हँडलवर जोर लावून लॉक तोडणे शक्य असल्याने त्याच गाड्यांची मोठ्या संख्येने चोरी केल्याची कबुली अटक टोळीने दिली आहे. तर नवी मुंबईसह मुंबई, ठाणे व इतर परिसरातून या दुचाकी त्यांनी चोरल्या होत्या. त्यानंतर पुण्याच्या नारायणगाव, ओतुर अशा ग्रामीण भागात १५ ते २० हजार रुपयांना त्याची विक्री केली होती. आतकरी व तांबे या दोघांना यापूर्वी रायगड पोलिसांनी दुचाकी चोरीप्रकरणी अटक केली होती. (प्रतिनिधी)