मुंबई : मुंबईतील दत्तप्रसाद सावंत आणि शंतनू जोशी या दोन तरुण संशोधकांनी नुकताच एका नव्या ‘डॅमसेलफ्लाय’ म्हणजेच टाचणीच्या प्रजातीचा शोध लावला आहे. ही टाचणी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली असून तिला ‘सिंधुदुर्ग मार्श डार्ट’ असे नाव देण्यात आले आहे. या टाचणीचे नमुने बंगळुरु येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस या संस्थेत जतन करण्यात आले आहेत. तसेच हे संशोधन ‘जर्नल ऑफ थे्रटण्ड टॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
पावसाळ्यात केवळ जुलै ते सप्टेंबरच्या पहिला आठवडा या कालावधीत ही टाचणी साचलेल्या गोड्या पाण्याजवळ आढळून येते. ऑगस्ट २०१७ मध्ये ही टाचणी दत्तप्रसाद यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमलेश्वर गावाच्या तळ्याकाठी आढळली. त्याचे फोटो काढून शंतनू यांच्याकडे अभ्यासासाठी पाठविले होते. त्यानंतर या संशोधकांनी नमुने गोळा करून त्यांनी सखोल तपासणीनंतर निष्कर्ष काढण्यात आला. ही टाचणी नक्कीच वेगळी असून याआधी अशा प्रजातीचे वर्णन केलेले नाही. काही आंतरराष्ट्रीय संशोधकांचे मत जाणून घेतल्यावर या प्रजातीला नवी ओळख देण्याचे निश्चित झाले. याचे शास्त्रीय नाव ‘सेरियाग्रिऑन क्रोमोथोरॅक्स’ असे ठेवण्यात आले.
संशोधक दत्तप्रसाद सावंत यांनी यासंदर्भात सांगितले की, चतूर आणि टाचण्या हे वेगवेगळे गट आहेत. इंग्रजी भाषेमध्ये ‘ओडोनेट’ या शब्दामध्ये चतूर आणि टाचण्यांचा समावेश केला जातो. ही टाचणी पिवळ्या रंगाची आहे. २०१८ साली मादी टाचणी आढळली. दोन्हींवर संशोधन सुरू आहे. नर लांबी ३.९ सेंटीमीटर आणि मादीची लांबी ३.७ सेंटीमीटर असते. नर टाचणीचा रंग हळदीसारख्या पिवळा, तर मादीचा रंग थोडाफार हिरव्या रंगाचा असतो. टाचण्याचे छोटे डास व किटक, अळ्या इत्यादी खाद्य आहे.सप्टेंबर महिन्यानंतर टाचण्या जातात कुठे?आता नवी ६१ व्या ‘सिंधुदुर्ग मार्श डार्ट’ या टाचणीचा शोध लागला आहे. याबाबतचे संशोधन पत्र प्रसिध्द करण्याचे आहे. सिंधुदुर्गामध्ये दोन ठिकाणी ही प्रजाती दिसून आली आहे. ही प्रजाती पश्चिम घाटामध्ये आढळते, पण नेमक्या भागात याचा शोध घेणे आवश्यक आहे. गोड्या पाण्याचे साठे आहेत, त्यावर अतिक्रमणे होऊ लागली आहेत. त्यानुसार त्यांचा ट्रेन्ड काय आहे. तसेच सप्टेंबरनंतर या टाचण्या जातात कुठे? यावर पुढील संशोधन सुरू होईल, असेही भाष्य दत्तप्रसाद सावंत यांनी केले.
देशात शंभर वर्षांनंतर प्रथमच सेरियाग्रिऑन जीनसमध्ये नवीन प्रजातीचा समावेश झाला आहे. देशातील इतर भागांच्या तुलनेत पश्चिम घाटात चतुर आणि टाचण्यांचा अभ्यास जास्त झाला आहे. तरीही येथून टाचणीची नवी प्रजाती शोधली जाते, ही कौतुकास्पद बाब आहे.- शंतनू जोशी, संशोधक