साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजेंना रोखण्याचं उदयनराजेंसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 05:29 PM2019-07-31T17:29:35+5:302019-07-31T17:30:13+5:30
शिवेंद्रसिंह राजे यांनी पक्षांतर केल्यामुळे उदयनराजे यांच्यासोबत असलेली पक्षांतर्गत लढाई आता आमने-सामने होणार आहे. त्यात उदयनराजे यांच्या मदतीला राष्ट्रवादी असून ही फाईट टाईट होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई – साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना रोखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अपयश आले. शिवेंद्रसिंह यांनी आमदाराकीचा राजीनामा दिल्यानंतर आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र पक्षात रोखून धरण्यात अपयशी ठरलेल्या राष्ट्रवादीने शिवेंद्रसिंहराजेंना शह देण्यासाठी नवीन खेळी आखली आहे.
स्थानिक राजकारणात खासदार उदयनराजे यांच्या उपद्रवामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचे शिवेंद्रसिंह राजे गेल्या काही दिवसांपासून सांगत होते. राजीनाम्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली होती. राष्ट्रवादीकडून निवडून येण्याचे दिवस आता गेले, असंही ते म्हणाले होते. शिवेंद्रसिंह राजे यांच्याबरोबर २२ जिल्हा परिषद सदस्य आणि ९ जिल्हा बँकेचे संचालक भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान शिवेंद्रसिंह राजे यांना कोंडीत पकडण्यासाठी सातारा जावळी मतदार संघातून उदयनराजे यांच्या हाती सुत्र देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सातारा-जावळी मतदार संघातील राजकीय लढाई राज्यात चुरशीची ठरू शकते. लोकसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे यांचे मनोमिलन झाले होते. परंतु, निकाल लागल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वितुष्ट आल्याचे सांगण्यात येते. शिवेंद्रसिंह राजे यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीसमोर कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, माजी सभापती अमित कदम किंवा आमदार शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे यांचे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी उदयनराजे कोणाला निवडणार की, आणखी चौथा पर्याय शोधणार हे येणारा काळच सांगेल.
दरम्यान शिवेंद्रसिंह राजे यांनी पक्षांतर केल्यामुळे उदयनराजे यांच्यासोबत असलेली पक्षांतर्गत लढाई आता आमने-सामने होणार आहे. त्यात उदयनराजे यांच्या मदतीला राष्ट्रवादी असून ही फाईट टाईट होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.