...तर उदयनराजेंनी स्वाभिमान पक्षात यावे! नितेश राणेंचे आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 04:49 PM2018-10-08T16:49:53+5:302018-10-08T18:48:46+5:30
उदयनराजे भोसले एक ताकदवर नेते आहेत. ते आमचे चांगले मित्र आहेत. मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जात आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांचेही स्वागत आहे. असे ट्विट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी करुन एकप्रकारे खासदार उदयनराजे भोसलेना स्वाभिमान पक्षात यायचे आवतन दिले आहे.
कणकवली : उदयनराजे भोसले एक ताकदवर नेते आहेत. ते आमचे चांगले मित्र आहेत. मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जात आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांचेही स्वागत आहे. असे ट्विट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी करुन एकप्रकारे खासदार उदयनराजे भोसलेना स्वाभिमान पक्षात यायचे आवतन दिले आहे.
उदयनराजे एक ताकदवर नेते आहेत..आमचे चांगले मित्र आहेत..
— nitesh rane (@NiteshNRane) October 8, 2018
मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षत जात आहे ..
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांच ही स्वागत आहे!
सातारा लोकसभेच्या उमेदवारीवरुन मुंबईत रविवारी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत घमासान झाले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांच्या समर्थकांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध केला. बैठकीत रामराजे यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी झाली. या बैठकीला खासदार उदयनराजे उशिरा पोहोचले. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे यांच्याशी १५ मिनिटे कमराबंद चर्चा केली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे. शरद पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. उमेदवारी मागण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. गेल्या वेळेला मला मिळालेले मताधिक्य पक्षाने लक्षात घेतले पाहिजे. माझे लीड तोडणारा कोण असेल तर माझी माघार असेल. त्याचवेळी अनेक पक्षात माझे आमदार व खासदार मित्र आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमिवर उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्याचा धागा पकडत आमदार नितेश राणे यांनी मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जात आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांचेही स्वागत आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान , आमदार नीतेश राणे यांच्या या ट्वीट नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाबाबत उलट सुलट चर्चा रंगली आहे. यापूर्वी स्वाभिमान पक्षाध्यक्ष नारायण राणे यांनी पक्षातर्फे आगामी निवडणुका पूर्ण ताकदिने लढविणार असल्याचे जाहिर केले होते.
कार्यकर्त्याना कामाला लागण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करण्याच्या दृष्टिने चाचपणी सूरू केली आहे. त्यामुळे यापार्श्वभूमिवर आमदार नीतेश राणे यांचे हे टिवट महत्वपूर्ण मानले जात आहे.