सातारा - राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेल्या उदयनराजेंचा राष्ट्रवादी काँग्रेसचे २०१९ च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव केला होता. श्रीनिवास पाटील यांच्याकडून झालेल्या या पराभवाची सल अद्यापही उदयनराजेंच्या मनात आहे. दरम्यान, आता सातारामधील नगरपालिका निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या भाजपाच्या दोन राजेंना एकाचवेळी पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी साताऱ्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. तसेच शरद पवार यांनीही दोन्ही राजेंना एकाचवेळी पराभूत करण्यासाठी सकारात्मक संकेत दिल्याची चर्चा आहे. (Udayanraje Bhosale defeated in Lok Sabha, now NCP will make strategy to defeat both Rajes at the same time in Satara )
सातारा नगरपालिकेची निवडणुक येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे. त्याच्याच पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दीपक पवार यांनी सातारा नगरपालिकेत दोन्ही राजेंच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल उभे करण्याचा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडला. शरद पवार यांनीही या प्रस्तावाबाबत सकारात्मक मत प्रदर्शित केले आहे. तुमच्या प्रस्तावाबाबत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ, असे शरद पवार यांनी दीपक पवार यांना सांगितले.
राष्ट्रवादीने साताऱ्यामध्ये याआधी कधीही पक्षीय पॅनेल दिला नव्हता. मात्र यावेळी शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन दोन्ही राजेंना साताऱ्यात आव्हान द्यावे. तसे केल्यास उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना आपण पराभूत करू शकतो, असा विश्वास दीपक पवार यांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे सध्या भाजपात असलेल्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात तितकेचे सख्य नाही आहे. विविध कारणांवरून त्यांच्यात खटके उडत असतात. दरम्यान, आगामी नगरपालिका निवडणुकीतही ते एकक्र येण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे या दोन्ही राजेंमधील या मतभेदांचाही राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो.