भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी माझ्याकडे विमान, रेल्वे अशी सर्व तिकीटे आहेत, लोकसभेचे माहिती नाही, असे म्हणत पहिल्या यादीत नाव जाहीर न झाल्याने नाराजी व्यक्त केली होती. यानंतर फडणवीसांची भेट घेत त्यांनी दिल्ली गाठली होती. गेल्या तीन दिवसांपासून ते अमित शाह यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत आहेत. अशातच सातारा मतदारसंघातून उमेदवारी द्या अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी भाजपाकडे केली आहे.
उदयनराजेंना तिकीट मिळणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात असताना एकेकाळी शिवसेनेकडून लढलेल्या नरेंद्र पाटलांनी भाजपाकडे तिकीट मागितल्याने साताऱ्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 'गेल्या वेळी मी शिवसेनेकडून लढलो होतो. उदयनराजेंविरोधात लढायला कुणीच तयार होत नव्हता. पण मी लढलो आणि चार लाखांच्यावर मते घेतली होती. उदयनराजे यांच्यापेक्षा मला 30 ते 35 हजार मते कमी होती. सातारा लोकसभा मतदार संघात माझी चांगली पकड आहे, त्यामुळे यावेळी भाजपने मला संधी द्यावी, फडणवीस ती संधी देतील अशी अपेक्षा आहे, असे पाटील म्हणाले.
उदयनराजे हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत मुक्कामी आहेत. मात्र त्यांना भेट मिळत नाही हे खूप वाईट आहे. उदयनराजे यांनी सबुरीने घ्यायला हवे, पक्ष जो निर्णय देईल तो मान्य करायला हवा. सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. कुणबी मराठा प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर वाटप होत आहेत. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांनाही 10 टक्के आरक्षण घोषित झाले आहे. सगे सोयरे अंमलबजावणी होण्यासाठी वेळ लागेल, हरकती पडताळून पुढील कार्यवाही होईल मग अशावेळी आंदोलन करणे योग्य नाही, असा सल्लाही त्यांनी जरांगे पाटलांना दिला आहे.
माथाडी कामगारांच्या मुलांसाठी काही कायदे आहेत. कामगार मंत्रालयातून सांगितल्याप्रमाणे येथील प्रशासन निर्णय घेत आहे, हे अयोग्य आहे. राज्याला एखादा चांगला कामगार नेता मंत्री म्हणून मिळणे आवश्यक आहे, असे नरेंद्र पाटील म्हणाले.