भाजपमधील 'या' खास व्यक्तीच्या उपस्थितीत उदयनराजेंचा भाजप प्रवेश ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 01:58 PM2019-08-31T13:58:35+5:302019-08-31T13:59:47+5:30
भाजप प्रवेशासंदर्भात शुक्रवारी उदयनराजे यांना विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. तसेच आपल्याला राजकारणापासून अलिप्त व्हावं वाटत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील अनेक नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. परंतु, आता विद्यमान खासदारही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश कऱणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे उदयनराजे यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजपमधील एक खास व्यक्ती येणार असल्याचे बोलले जात आहे. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच याचे संकेत दिले आहेत.
सातारा आणि सांगलीत आलेल्या महापुरानंतर खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचवेळी उदयनराजे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. तर उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रसिंह राजे यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला असून रामराजे निंबाळकर देखील भाजपच्या वाटेवर आहेत. त्यात उदयनराजे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानले जात आहे. त्यामुळे साताऱ्यातील राष्ट्रवादीची स्थिती आणखीच बिकट झासी आहे.
दरम्यान आपला भाजप प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित व्हावा अशी उदयनराजेंची इच्छा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी विचारण्यात आले. त्यावर पाटील म्हणाले की, उदयनराजे हे राजे आहेत. त्यांची तशी इच्छा असेल तर तीही पूर्ण करू. यावरून उदयनराजे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप किती प्रयत्नशील आहे, हे दिसून आले.
दुसरीकडे भाजप प्रवेशासंदर्भात शुक्रवारी उदयनराजे यांना विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. तसेच आपल्याला राजकारणापासून अलिप्त व्हावं वाटत असल्याचे त्यांनी सांगितले होते.