नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर देशातील नामांकित महिला पैलवानांनी लैगिंक छळाचा आरोप केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात ब्रीजभूषण यांच्यावरील आरोपात तथ्य असल्याचे म्हटले आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापल्याचे दिसते. आरोपांमध्ये तथ्य असतानाही भाजपा खासदारावर कारवाई का होत नाही असा प्रश्न विरोधक करत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील ब्रीजभूषण यांच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार सिंह यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. "एका तक्रारदाराने अशा सहा ठिकाणांचा उल्लेख केला आहे, जिथे ब्रिजभूषण यांनी तिचा विनयभंग केल्याचे सांगण्यात आले आहे. आत्तापर्यंतच्या तपासानुसार, ब्रिजभूषण सिंह हे लैंगिक छळ, विनयभंग या गुन्ह्यांसाठी कायदेशीर कारवाईसाठी पात्र आहेत", असे दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.
अंबादास दानवेंची बोचरी टीका अंबादान दानवेंनी भाजपावर टीका करताना एक व्हिडीओ शेअर करत म्हटले, "खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांचा हा खालील व्हिडीओ पाहून अनिल कपूरच्या 'नायक' सिनेमातील अंबरीश पुरी यांची आठवण झाली. मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ढोल वाजवणाऱ्या भाजपामध्ये कणखर भूमिका घेणारी, नितीमत्ता शिल्लक असलेली एकही व्यक्ती नाही, जी अश्या मस्तवाल वागणाऱ्या स्वपक्षीय खासदाराला जाब विचारेल. बरोबर, सरकारं बनवण्यात, पाडण्यात मती गुंग असेल तर असे ब्रिजभूषण कसे दिसतील. बाकी 'नारी के सन्मान मे...' हा नारा भाजप शासित नसलेल्या राज्यात चुना लावून ठोकायला मात्र हे मोकळे आहेत."
२३ एप्रिलपासून जवळपास दीड महिने पैलवानांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले. या आंदोलनाला देशातील विविध संघटनांसह राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पैलवानांनी आखाड्याबाहेरील कुस्ती स्थगित करण्याचा निर्णय घेतला.