Uddhav Thackeray trolled, BJP: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा खेडमध्ये आज शिवगर्जना मेळावा झाला. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या होम ग्राऊंडवर झालेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले. "उद्या शिमगा आहे, त्यानंतर धुळवड आहे. त्यानंतर रंगपंचमी आहे. त्यानंतर अशी हुकूमशाही सुरू होईल की तुम्हाला डोकेही वर काढता येणार नाही. आता आपण देशासाठी उभे राहिलो नाही, तर 2024 या देशातील शेवटच्या निवडणुका ठरतील," असे मोठे विधान उद्धव ठाकरेंनी आजच्या सभेत केले. पण भाजपाच्या नेतेमंडळींनी मात्र उद्धव यांना प्रत्युत्तर दिले. तसेच, भाजपाच्या एका नेत्याने त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवली.
"आपला देश पुन्हा गुलामगिरीत जाणार नाही, यासाठी प्रतिज्ञा करा. देशासाठी, महाराष्ट्रासाठी माझ्यासोबत येणार का, चोरांसोबत जाणार. आता आपले हात रिकामे आहेत, घरादारावर धाडी पडू शकतात तरी माझ्यासोबत येणार का? जनता जो निर्णय करेल, तो आपल्याला मान्य असेल," असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण सभेसाठी स्थानिक जनता उपस्थित नसल्याचा दावा भाजपाकडून करण्याता आला. "खेडच्या सभेसाठी मुंबई, रायगड, ठाणे, मुंबईतून गर्दी जमवली होती. तेच तेच टोमणे आणि तिच तिच किरकिर ऐकण्यासाठी कोण उत्स्फूर्तपणे येईल…" अशा शब्दांत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्या भाषणाची टिंगल केली.
भाजपा प्रदेशाध्यक्षांनीही घेतला ठाकरेंच्या भाषणाचा समाचार
उद्धव ठाकरेंच्या साधूसंतांच्या विधानावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. "भाजपाच्या व्यासपीठावर आधी साधू असायचे, आता संधीसाधू असतात असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या. पालघरची घटना इतक्यात विसरलात का? मारेकऱ्यांना तुम्ही पोटाशी धरले. रक्ताचे पाट तुमच्याच कारकिर्दीत वाहिले. शिमग्याच्या बोंबा पुरे आता.." असे ट्विट करत बावनकुळे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.