मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. 40 आमदार आणि 12 खासदारांसह अनेक पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले. यातच पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठीउद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी खेळली आहे. संजय राठोड यांच्या मतदार संघातील माजी राज्यमंत्री आणि भाजप नेते संजय देशमुख (Sanjay Deshmukh)यांचा आज मातोश्रीवर शिवबंधन बांधून पक्षप्रवेश झाला आहे.
डिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेते प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांना शिवबंधन बांधले. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत मागील महिन्यात अकोला येथे आले असता देशमुख यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली होती. तेव्हापासूनच देशमुख हे उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेण्याची शक्यता वर्तविली जात होती.
कोण आहेत संजय देशमुख?संजय देशमुख आणि संजय राठोड यांची सुरुवात शिवसेनेतूनच झाली. पण, कालांतराने दोघे वेगवेगळ्या पक्षात गेले. देशमुख यांनी 1999 ते 2009 असे दहा वर्षे दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. दिग्रसमधील स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांची मजबूत पकड आहे. 1999 मध्ये शिवसेनेत असताना विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने देशमुख हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. त्यावेळी त्यांनी 125 मतांनी राष्ट्रवादीच्या ख्वाजा बेग यांचा पराभव करून विधिमंडळात प्रवेश केला.
त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. मात्र भाजप-सेना युतीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी संजय राठोड यांच्याविरोधात अपक्ष म्हणून बंडखोरी केली. त्यावेळी त्यांना 75 हजारांवर मते मिळाली होती. मतदारसंघातील विविध संस्थांवर देशमुख यांचे वर्चस्व असल्याने त्यांच्या प्रवेशानंतर मतदारसंघातील गणिते बदलण्याची शक्यता आहे.