जळगाव - मुख्यमंत्रिपदावरून वाद होऊन युती तुटल्यापासून एकेकाळचे मित्र असलेले शिवसेना आणि भाजपा हे आता एकमेकांचे हाडवैरी झाले आहेत. भाजपाशी युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकासआघाडी करून सत्ता स्थापन केली आहे. मात्र विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाकडून हे सरकार पाडण्यासाठी येनकेन प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपाला उद्धव ठाकरे यांनी आज थेट आव्हान दिले आहे. मुक्ताईनगर येथे उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे भाजपाला उद्देशून म्हणाले की, ''ऑपरेशन लोटस ने तुम्हाला लोटलं, आता सरकार पडण्याची हिम्मत दाखवून पाहा.'' दरम्यान, २५ वर्षे ज्यांच्या सोबत होतो त्यांनी कधी विश्वास दाखवला नाही. आणि ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला. आपण मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी का स्वीकारली याचाही उलगडा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. ''उद्धव हे तू करणार नसशील तर हे होणारच नाही असे शरद पवार म्हणाले होते. म्हणून मी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतली,'' असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, २ लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा सरकारचा निर्णय ही माझ्या कारकिर्दीची सुरुवात होती. आता २ लाखाच्यावर कर्ज आणि नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच निर्णय घेणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - मुक्ताईनगर आज मुक्त झाले कशा पासून कुणापासून हे तुम्हाला ठाऊक आहे- उद्धव हे तू करणार नसेल तर हे होणारच नाही असे शरद पवार म्हणाले होते. म्हणून मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली- २५ वर्ष ज्यांच्या सोबत होतो त्यांनी कधी विश्वास दाखवला नाही. आणि ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला- आता २ लाखाच्यावर कर्ज आणि नियमितपणे कर्ज फेडणा-यांसाठी लवकरच निर्णय घेणार- ऑपरेशन लोटस ने तुम्हाला लोटलं आता सरकार पडण्याची हिम्मत दाखवून पाहा- शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातुन मुक्त करीत शेतात दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे वचन देतो- प्रशासन मला कळत नाही अशी विरोधक टिका करतात. त्याचा फार फरक पडत नाही. जनतेची काम झाली आणि होत आहे हे महत्त्वाचे