महाराष्ट्र निवडणूक 2019 : निकालाच्या दिवशीचं उद्धव ठाकरेंचं 'ते' विधान धक्कादायक; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला 'दे धक्का'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 05:57 PM2019-11-08T17:57:04+5:302019-11-08T18:02:54+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने घेतलेली आडमुठी भूमिका तसेच शिवसेना नेत्यांकडून होत असलेल्या विधानांवरून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने घेतलेली आडमुठी भूमिका तसेच शिवसेना नेत्यांकडून होत असलेल्या विधानांवरून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले सर्व पर्याय खुले असल्याचे विधान धक्कादायक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला १६० हून अधिक जागा मिळाल्या. त्यापैकी १०५ जागा एकट्या भाजपाला मिळाल्या होत्या. दुर्दैवाने आमच्या काही जागा कमी आल्या. त्याचदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन करण्याबाबत आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे यांचे हे विधान आमच्यासाठी धक्कादायक होते. जनतेने महायुतीला मतदान केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे असे का म्हणाले असावेत असा प्रश्न आम्हाला पडला.''
Devendra Fadnavis: Unfortunately,day when results came,Uddhav ji said all options open for Govt formation.That was shocking for us as people had given mandate for alliance and in such circumstances it was a big question for us that why he said all options are open for him pic.twitter.com/leOA9s4d5m
— ANI (@ANI) November 8, 2019
दरम्यान, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आश्वासनाबाबतही फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ''अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाल तर अशाप्रकारचा कुठलाही मुद्दा माझ्यासमोर चर्चिला गेला नव्हता. तसेच युतीची घोषणा करतानाही याबाबत कुठलाही निर्णय झाला नव्हता. कदाचित उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये असे आश्वासन दिले गेले असावे, असे आम्हाला वाटले. म्हणून अमित शाह यांच्याकडे याबाबत विचारणा केली. मात्र त्यांनीही अशाप्रकारचे आश्वासन दिले नसल्याचे सांगितले.'' असे मुख्यमंत्री म्हणाले.