मुंबई - आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न दिल्याने नाराज चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षाने (टीडीपी) आज केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि पंतप्रधानांकडे राजीनामे सुपूर्द केले. याच धरतीवर राज ठाकरे यांनी शिवसेनेवर बोचरी टिका करणारे कार्टून काढले आहे. 'राजीनामे आमच्या खिशात आहेत', आम्ही कधीही देऊ असे सेनेचे नेते पक्षात आल्यापासून सांगत आहेत. पण अजून दिले नाहीत. हाच धागा पकडून स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान या मथळ्याखाली राज ठाकरेंनी शिवसेनेवर व्यंगचित्रातून बाण सोडला आहे. यात उद्धव ठाकरे, चंद्राबाबू नायडू आणि आणखी एकजण दाखवण्यात आले आहे. तर खिडकीतून मोदी पाहत असल्याचे दिसत आहेत.
उद्धव ठाकरे चंद्राबाबूंकडे पाहत म्हणतात ''हॅss, यात कसला अलाय 'मर्द'पणा? त्यांना म्हणावं हिम्मत असेल तर सरकारमध्ये राहून अपमान गिळूनवर सरकारला धमक्या देऊन दाखवा''
चंद्राबाबू सत्तेतून बाहेर पडल्याने सर्वत्र शिवसेनेची चर्चा सुरु झाली. कारण शिवसेनेने याआधी अनेकदा बाहेर पडण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्याच अनुशंघाने राज ठाकरेंने यावेळी व्यंगचित्र रेखाटले आहे. आपल्या फेसबूक अकाऊंटवर राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या सत्तेत राहून विरोध करण्यावर आणि सतत राजीनाम्याची धमकी देण्यावर खिल्ली उडवणारं व्यंगचित्र टाकलं आहे, ज्याला सोशल मीडियावर भरभरुन प्रतिसाद दिला आहे. यामध्ये काही नेटीझन्सनी राज ठाकरेवरही टीका केली आहे. कार्टून काढण्यात जेवढी तत्परता दाखवली तेवढी तत्परता पक्षबांधनीत दाखवयला हवी असा टोला एका युझर्सने मारला आहे.