मुंबई- काश्मीरच्या सीमेवर पाकड्यांच्या हल्ल्यात रोजच जवान बलिदान देत आहेत. त्यामुळेही देशाला क्लेश होत आहेत. तेव्हा या क्लेशाचा निषेध म्हणून सरकार आत्मक्लेश आंदोलन कधी करणार आहे? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सामना संपादकीयमधून विचारला आहे. काँग्रेस व भाजपाच्या उपोषणानंतर सामना संपादकीयमधून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेसच्या फसलेल्या उपोषणास प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने त्यांचा उपोषण उत्सव साजरा केला, पण तिथेही अनेक भाजप कार्यकर्त्यांनी खाऊन–पिऊन उपोषण केल्याचे उघड झाले, या उपोषणाने नक्की काय साध्य झाले हे कोणी सांगू शकणार नाही, असं म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानात पंतप्रधान मोदींनी हाती झाडू घेतला म्हणून अनेकांनी ‘स्वच्छ’ असलेले रस्ते झाडण्यासाठी हाती झाडू घेतला, पण देश खरेच स्वच्छ झाला काय? उपोषण व आत्मक्लेशाचेही तसेच आहे.
भारतीय जनता पक्ष हा मनाने अत्यंत हळवा व संवेदनशील वगैरे असल्याने त्या मंडळींनी एक दिवसाचे उपोषण केले व स्वतःला आत्मक्लेश करून घेतले. विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज वाया गेल्याचा निषेध म्हणून भाजपने हे देशभर उपोषण केल्याचे सांगितले आहे. संसदेचे अधिवेशन गुंडाळून आठ दिवस होत आले. त्यामुळे ज्या दिवशी अधिवेशन गुंडाळले त्या दिवशीच संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर पंतप्रधानांसह सगळ्यांनीच या उपोषणाचा बार उडवायला हवा होता, पण आठ दिवसांनी उपोषण व संसदेतील वाया गेलेल्या कालखंडाचा विचार सुचला. उत्तर प्रदेशातील महिला अत्याचाराविरोधात राहुल गांधी व त्यांच्या काँग्रेसने एक दिवसाचे ‘खाऊन-पिऊन’ उपोषण केले. दिल्लीतील बडे काँग्रेस नेते उपोषणाआधी हॉटेलात जाऊन ‘छोले भटुरे’वर कसा यथेच्छ ताव मारीत आहेत त्याची खमंग छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. स्वतः राहुल गांधी उपोषणस्थळी उशिरा पोहोचले. आदल्या दिवशीचे ‘डिनर’ त्यांनी बहुधा पहाटे केले व त्यामुळे उठायला उशीर झाला असावा. इतर काँग्रेसवाल्यांनीही उपोषणाचा कार्यक्रम गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे देशभरातून त्यांच्या उपोषणाचे हसे झाले. भाजपने तर सोशल मीडियावर खिल्ली उडवली. काँग्रेसच्या फसलेल्या उपोषणास प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने त्यांचा उपोषण उत्सव साजरा केला, पण तिथेही अनेक भाजप कार्यकर्त्यांनी खाऊन–पिऊन उपोषण केल्याचे उघड झाले. या उपोषणाने नक्की काय साध्य झाले हे कोणी सांगू शकणार नाही. या देशातील बहुसंख्य जनता आजही उपाशीच असते.
कुपोषणाने मुलांचे बळी जातच आहेत. भूक व उपासमारीस कंटाळून कुटुंबेच्या कुटुंबे आत्महत्या करीत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजप सरकारच्या काळातच तीन हजारांवर लोकांनी आत्मक्लेश म्हणून आत्महत्या केल्या व देशात चार लाखांवर शेतकऱ्यांनी हा ‘आत्मक्लेश’ करून घेतला. सरकारच्या फसलेल्या नोटाबंदीने लाखो लोकांचा रोजगार बुडाला. त्या क्लेशामुळेही अनेकांनी जीवनयात्रा संपवली. कश्मीरच्या सीमेवर पाकडय़ांच्या हल्ल्यात रोजच आमचे जवान बलिदान देत आहेत. त्यामुळेही देशाला क्लेश होत आहेत. तेव्हा या क्लेशाचा निषेध म्हणून सरकार आत्मक्लेश आंदोलन कधी करणार आहे? महात्मा गांधी हे उपोषण करीत व काँग्रेस पक्षाला त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी झुकवीत. आचार्य विनोबा भावे उपोषण करीत असत. सीमा प्रश्न सुटावा म्हणून सेनापती बापट उपोषणास बसले, पण इंदिरा गांधी यांनी आश्वासन देऊनही सीमा प्रश्न सोडवला नाही. अण्णा हजारे यांनीही नुकतेच दिल्लीत उपोषण केले. त्या उपोषणानेही नक्की काय हाती लागले?
काँग्रेस राजवटीत अण्णा हजारे उपोषणास बसले तेव्हा अण्णांचा ‘जय जय’ करण्यात भाजप आघाडीवर होता, पण आज अण्णा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषणास बसले तेव्हा भाजप सरकारने अण्णांपासून पळ काढला. म्हणजे काँग्रेस काळातले अण्णांचे उपोषण ज्यांनी डोक्यावर घेतले त्यांनीच कालचे अण्णांचे उपोषण अपयशी ठरेल याची व्यवस्था केली. उपोषण हे राजकीय हत्यार झाले आहे असे आम्ही म्हणतो ते यासाठीच. २०१४ साली जी वचने दिली त्यातील कशाचीच पूर्तता झालेली नाही. त्या फसवणुकीचा आत्मक्लेश आजही देशाची जनता करून घेत आहे. संसद अधिवेशनाचा कालखंड हा तसा वायाच जात आहे. काँग्रेस राजवटीतही संसदेचा मोठा कार्यकाल वायाच गेला. बोफोर्सपासून टूजी घोटाळ्यापर्यंतच्या वादांवरून तेव्हाच्या विरोधकांनी गदारोळ केला आणि संसदेचे कामकाज होऊ दिले नव्हते. पुन्हा असे करणे म्हणजे जनतेच्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून देणे, असे तेव्हा सांगितले गेले. मग नोटाबंदीपासून कोकणात लादलेल्या विषारी नाणार प्रकल्पापर्यंत शिवसेना आवाज उठवत आहे. हा जनतेचा आवाज नाही काय? फक्त आम्ही उपोषणाचे ढोंग केले नाही इतकेच. स्वच्छ भारत अभियानात पंतप्रधान मोदींनी हाती झाडू घेतला म्हणून अनेकांनी ‘स्वच्छ’ असलेले रस्ते झाडण्यासाठी हाती झाडू घेतला, पण देश खरेच स्वच्छ झाला काय? उपोषण व आत्मक्लेशाचेही तसेच आहे.