समिती सभापतींची बिनविरोध निवड

By admin | Published: April 4, 2017 03:46 AM2017-04-04T03:46:55+5:302017-04-04T03:46:55+5:30

रायगड जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच धडाकेबाज असे घडत असते. सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात असाच राजकीय विस्फोट झाल्याचे दिसून आले

Unanimous selection of committee chairmen | समिती सभापतींची बिनविरोध निवड

समिती सभापतींची बिनविरोध निवड

Next

आविष्कार देसाई,
अलिबाग- रायगड जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच धडाकेबाज असे घडत असते. सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात असाच राजकीय विस्फोट झाल्याचे दिसून आले. शिवतीर्थावर सत्ता काबीज करण्यासाठी शेकाप, राष्ट्रवादीला पुरेपूर मदत करणाऱ्या काँग्रेसला विषय समितीच्या सभापतीपदापासून वंचित ठेवले गेले. आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेसच्या वाट्याला एक सभापतीपद देण्याचे ठरले होते, मात्र आघाडीचे प्रतोद पद देऊन शेकाप, राष्ट्रवादीने त्यांची बोळवण केल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरुवातीलाच आघाडीचा धर्म न पाळण्याचे ढग शिवतीर्थावर दाटून आल्याचे चित्र होते. रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या निवडी बिनविरोध सोमवारी पार पडल्या.
महिला व बाल कल्याण सभापतीपदी राष्ट्रवादीच्या उमा मुंढे, तर समाज कल्याण सभापतीपदी शेकापचे नारायण डामसे यांची निवड करण्यात आली. अन्य दोन विषय समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीचे नरेश पाटील, शेकापचे डी.बी.पाटील या दोन सदस्यांच्या पदरात पडले. काँग्रेसला मात्र हात चोळण्याची वेळ आली.
रायगड जिल्हा परिषदेच्या नाना पाटील सभागृहात सभापती निवड प्रक्रिया झाली. महिला व बाल कल्याण सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या उमा मुंढे, समाज कल्याण सभापतीपदासाठी शेकापचे नारायण डामसे यांचा एकेक अर्ज आला होता, तसेच अन्य दोन विषय समितींच्या सभापतीपदासाठी अनुक्रमे राष्ट्रवादीचे नरेश पाटील, शेकापचे डी.बी.पाटील यांचाही प्रत्येकी एकच अर्ज आला होता.त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सर्जेराव बनसोडे यांनी जाहीर केले. जिल्हा परिषदेमध्ये विरोधक असणाऱ्या शिवसेनेचे १८ सदस्य मात्र या सभेसाठी गैरहजर होते. त्यांनी उमेदवारांचे अर्ज दाखल न केल्याने निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते.
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची निवडणूकपूर्व युती होती. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सदस्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे तर उपाध्यक्षपदी शेकापचे आस्वाद पाटील यांना निवडून आणण्यासाठी मदत केली होती. या सर्वांचे फलित म्हणून काँग्रेसच्या वाट्याला एखादे सभापतीपद मिळेल अशी शक्यता होती. मात्र आघाडीचा धर्म पाळण्यात सत्ताधारी अयशस्वी झाल्याचे सभापतीपद निवडीवरून दिसून येते.
काँग्रेसची प्रतोदपदी बोळवण
काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी चिरनेर मतदार संघातून निवडून आलेले काँग्रेसचे बाजीराव परदेशी यांची आघाडीच्या प्रतोदपदी निवड करण्यात आली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी आधी आघाडीचे प्रतोद म्हणून नवनिर्वाचित उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांची निवड करण्यात आली होती. पनवेल येथे काही दिवसांपूर्वी आघाडीची सभा पार पडली होती. त्यामध्ये काँग्रेसला एखादे सभापती देण्याचे ठरले होते. मात्र काँग्रेसला प्रतोद पद देत त्यांची बोळवण केल्याचे चित्र आहे.
समाज कल्याण समिती, महिला व बालकल्याण तसेच अर्थ व बांधकाम समिती, कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध, शाळा समिती, शिक्षण, क्रीडा व आरोग्य समिती अशा पाच विषय समित्या आहेत. अर्थ व बांधकाम समिती सभापतीपद हे उपाध्यक्ष आस्वाद पाटील घेणार असल्याने उर्वरित सभापतीपदी निवडून आलेले नरेश पाटील आणि डी.बी.पाटील यांना कोणत्या खात्याचा कारभार सोपवायचा हे सर्वस्वी उपाध्यक्ष ठरवणार आहेत. १३ एप्रिलपर्यंत त्यांना हा निर्णय घ्यावा लागणार आहे.
काँग्रेसला सभापती देण्याचे ठरले होते. परंतु पुढील अडीच वर्षांनंतर त्याबाबतचा निर्णय आघाडीतील ज्येष्ठ नेते घेतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाजीराव परदेशी यांची आघाडीचे प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. सभागृहात आघाडीचे प्रतोद हेही पद महत्त्वाचे आहे. असे असले, तरी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे.
-अदिती तटकरे, अध्यक्ष,
रायगड जिल्हा परिषद
काँग्रेसला सभापतीपद देण्याचे ठरले होते, परंतु तसे झाले नाही. सभापती पुढील कालावधीत मिळेल.
-आर.सी.घरत,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Unanimous selection of committee chairmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.