मुंबई - राज्यातील सत्तानाट्यानंतर महाविकास आघाडीला विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. तर विरोधी बाकांवरील भाजपा सत्तेत आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ ५५ वरून थेट १५ वर आले. तर अद्याप विधान परिषदेतील आमदार शिंदे गटात थेट सहभागी झाले नाहीत. त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला देण्यात आले आहे.
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपसभापतींची भेट घेत याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दानवेंची निवड करण्याबाबतचे शिफारस पत्र दिले. त्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी यावर निर्णय घेत विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती केली आहे. मात्र आता याच निर्णयावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.
याबाबत अशोक चव्हाण म्हणाले की, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस इच्छुक होती. परंतु आम्हाला न विचारताच शिवसेनेने परस्पर हा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसमध्ये याबाबत स्वाभाविक नाराजी आहे असं त्यांनी सांगितले तर ज्यांचा आकडा मोठा त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद, विधान परिषदेत आमचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आमचाच आहे. नियमानुसार तेच असते असं सांगत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेसच्या नाराजीवर भाष्य केले.
राज्यात सत्तांतर घडल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये पदांसाठी रस्सीखेच सुरू आहे. विधानसभेत संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. परंतु विधान परिषदेत सभापती, विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. याठिकाणी विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला. शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्या नावाची विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चा होती. त्यानंतर उपसभपातींनी दानवे यांची निवड केल्याची घोषणा केली. विधान परिषदेत सध्या घडीला काँग्रेस-राष्ट्रवादीचे १० सदस्य आहेत. तर शिवसेनेचे १२ सदस्य आहेत. त्यात उपसभापतीपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे विराजमान आहेत. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं अशी मागणी काँग्रेसनं केली होती.