भीषण! कोविड स्मशानभूमीत वेडसर माणसाने खाल्ले मानवी अवयव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 08:22 PM2021-04-28T20:22:29+5:302021-04-28T20:25:47+5:30
दरम्यानच्या काळात तो मानवी देहाचे अवयव खात असल्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर पसरताच सर्वत्र खळबळ उडाली
फलटण - शहरालगत पंढरपूर रोडवर असलेल्या कोळकी येथील स्मशान भूमीत कोविडमुळे मृत झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जातात. याठिकाणी अर्धवट जळलेल्या मृतदेहांचे अवयव खाऊन भूक शमविण्याचा किळसवाणा प्रकार एका मनोरुग्णाने केला आहे. या स्मशानभूमीत दिवसरात्र बंदोबस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
फलटण शहरामध्ये कोळकी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारी स्मशानभूमी शासनाने अधिग्रहित करून तेथे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी अंत्यसंस्काराची सोय आहे. फलटण तालुक्यातील अनेक गावातून कोरोना बाधित मृत रुग्णांवर फलटण नगरपालिकेच्या कर्मचाºयांकडून एक वषार्पासून अंत्यसंस्कार केले जात आहेत. दररोज दहा ते पंधरा लोकांवर कोळकीच्या कोविड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत आहेत. अंत्यसंस्कारानंतर तेथे कोणीही थांबत नाही.
फलटण ते पंढरपूर हा रस्ता २४ तास वर्दळीचा असला तरी सध्या लॉकडाऊनमुळे या मार्गावर वाहतूक खूपच कमी झालेली आहे. त्यामुळे रस्त्याकडेला असणाऱ्या स्मशानभूमीत वेडसर लोकांचा वावर वाढलेला आहे. काल संध्याकाळी उशिरा काही मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यावर नगरपालिकेचे कर्मचारी निघून गेले होते. सकाळी वेडसर असणाऱ्या मनोरुग्णाने जळत असणाऱ्या चितेतून मानवी अवयव काढून ते खाण्यास सुरुवात केली. जे अर्धवट जळालेले अवयव होते ते अवयव तो पुन्हा भाजून खात असल्याचे लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत नगरपालिकेला कळविले काही लोकांनी त्यावेळेस तर त्या वेडसर माणसाला हाकलून लावले.
दरम्यानच्या काळात तो मानवी देहाचे अवयव खात असल्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर पसरताच सर्वत्र खळबळ उडाली. या घृणास्पद प्रकाराचा सर्वत्र निषेध झाला. कोळकी गावाच्या हद्दीत असणाऱ्या या स्मशानभूमीत मालकीहक्कावरून वाद सुरू आहे. या स्मशानभूमीत शक्यतो कोळकी मधील कोणीही ग्रामस्थ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणत नाहीत. गेल्या दोन-तीन दिवसापासून वेडसर वाटणारा सदरची व्यक्ती त्या परिसरात फिरत होती. भुकेला असल्याने त्याने मृतदेह खाल्ल्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. कोरोना बाधित मृत लोकांचे अवयव खाल्याने तो स्वत:ही बाधित झाला असण्याची शक्यता आहे.
कोळकी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या स्मशानभूमीत कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार केले केले जात आहेत. नगरपालिकेचे कर्मचारी तेथे अंत्यसंस्कार करतात. नगरपालिकेला त्या स्मशानभूमीवर खर्च टाकता येत नाही किंवा रखवालदार ही नेमता येत नाही. तेथे सोई-सुविधा आणि रखवालदार नेमण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केलेला आहे. सदरच्या वेडसर व्यक्तीला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांकडे स्वाधीन केलेले आहे. -प्रसाद काटकर, मुख्याधिकारी फलटण नगर परिषद
मानवी मृतदेहाचे अवयव खाणाऱ्या सदर वेडसर,मनोरुग्ण व्यक्तीस संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जिंती नाका येथे फलटण नगर परिषदेच्या कर्मचाऱ्या पकडून फलटण शहर पोलीससांकडे सुपूर्त केले आहे. त्याच्या हिंदी बोलण्यावरून तो परप्रांतीय वाटत आहे. सदर व्यक्ती मानवी मृतदेह खाण्याची चटक लागल्याने तो कोरोना बाधित होण्याबरोबर बाहेर राहिला तर खूप धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे त्याची रवानगी कोठे करावी हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तूर्तास त्याला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविणार असल्याचे फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांनी सांगितले