वडाची पाने, कडुलिंबाच्या काडीवर तरला संसार
By Admin | Published: September 8, 2016 02:38 AM2016-09-08T02:38:54+5:302016-09-08T02:38:54+5:30
प्रपंचाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून पैसे कमावणे ही काळाची गरज असली तरी आपल्या भोवती असलेल्या निसर्ग चक्राचा वापर करून अविरत कष्टातूनही कसे जगता येते
नरेश पाटील, लोनाड
प्रपंचाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून पैसे कमावणे ही काळाची गरज असली तरी आपल्या भोवती असलेल्या निसर्ग चक्राचा वापर करून अविरत कष्टातूनही कसे जगता येते, याचा वस्तुपाठच भिवंडी तालुक्यातील गोरसई गावातील सैनिक वसाहतीतील आदिवासी कुटुंबांनी घालून दिला आहे.
बकरीचे खाद्य म्हणून मागणी असलेली वडाची पाने आणि दातवण म्हणून वापरल्या जाणाऱ्या कडुलिंबाच्या काड्यांचा आधार घेत आदिवासींना आधार दिल्याचे वास्तव समोर आले आहे. जंगलाचे राजे म्हणून ज्यांचा गौरव होतो, त्यांना निसर्गानेच कसा आधार दिला, त्याचे प्रातिनिधिक चित्र नीरा सखाराम डाकी यांच्या रु पाने समोर आले आहे.
नीरा यांच्या पतीचे ३० वर्षांपूर्वी निधन झाले. कुटुंबातील कर्ता-कमावता काळाच्या पडद्याआड गेला. पण तीन मुलांच्या भविष्याची जबाबदारी नीरा यांच्या पदरात होती. मग बंदिस्त शेळीपालन करणाऱ्यांना सकस अन्न म्हणून लागणारी वडाची ताजी पाने विकून त्या अर्थाजन करू लागल्या. त्यातून कुटुंबाच्या गरजा भागावण्याचा प्रयत्न करू लागल्या. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर महिन्यात या पानांचे प्रमाण कमी होई. अशा काळात हाता-तोंडाची गाठ घालण्यासाठी त्यांनी उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला, तोही निसर्गातूनच. दात घासण्यासाठी दातवण म्हणून वापरल्या जाणाऱ्या कडुलिंबाच्या काड्या त्यांनी विकण्यास सुरु वात केली. त्यातून त्यांना बारमाही उत्पन्नाचा स्त्रोत गवसला.
वडाची पाने आणि कडुलिंबाच्या झाडाच्या काड्यांवर त्यांनी मुलांचे शिक्षण आणि लग्न कार्याची जबाबदारी पार पाडली.
नीरा यांच्यासोबत कल्पना बाळाराम जाधव आणि इतर अनेक मंडळी पावसाळ््यात भिवंडी तालुक्यातील दिघाशी, मांडोशी, कूंदे, करमाले, दाभाड, किरवली, शेडगांव, सोनटक्के, कवाड, विश्वभारती आदी गाव-पाड्यातील जंगल, माळरानातून वडाच्या झाडांची पाने जमा करतात. ती एकत्र करून भिवंडीला आमपाडा येथील बकरी बाजारात विकतात. त्यातून त्यांना आपल्या संसाराचा गाडा रेटता येतो.
भरपावसात तुडवतात जंगल
अंदाजे १०० पानांच्या जुडीला पानाच्या आकारानुसार दोन, पाच किंवा दहा रूपये असा दर मिळतो.
तसा तो मिळाला तर दिवसाकाठी १०० ते ५०० रूपयांची कमाई होते. पण या पैशांसाठी माळरानी, जंगलात हव्या तशा वडाच्या पानांचा शोध घेत फिरावे लागते.
ऐन पावसातील खडतर प्रवास, साप, विंचवाची तमा न बाळगत जीव जोखमीत घालून पाने जमवावी लागतात, अशी माहिती कल्पना जाधव यांनी दिली.
प्रचंड कष्टानेच दिला आधार
पतीच्या निधनानंतर माझ्यासह तीन मुलांच्या उदरनिर्वाहाचा यक्षप्रश्न माझ्यासमोर आ वासून उभा होता. त्यातूनच मग वडाची पाने कडुलिंबाच्या काड्यांचा आधार मिळाल.
कडुलिंबाची पाच ते सहा इंचाची एक काडी दोन ते पाच रु पये दराने विकली गेली आणि वडाच्या पानांची सोबत असली तर दिवसाकाठी २०० ते ५०० रूपये मिळू शकतात.
पण त्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतात. तसा हिशेब ठेवत वर्षभर काम केले तरच कुटुंबाचा गाडा हाकता येतो, असे नीरा यांनी सांगितले.