वरसोलीत कुटुंब वाळीत
By admin | Published: December 3, 2014 03:48 AM2014-12-03T03:48:23+5:302014-12-03T03:48:23+5:30
येथील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या वरसोली गावालाही वाळीत प्रकरणाचे ग्रहण लागल्याचे समोर आले आहे.
अलिबाग : येथील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या वरसोली गावालाही वाळीत प्रकरणाचे ग्रहण लागल्याचे समोर आले आहे. गावातील मच्छीमार नारायण भगत यांना देवस्थानाला जागा न दिल्याने कुटुंबीयांसह गेल्या ३१ आॅक्टोबरपासून वाळीत टाकले आहे. या प्रकरणी श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टचे १३ विश्वस्त, वरसोली कोळी समाज पंच समितीचे १४ सदस्य व अन्य २० अशा ४७ जणांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात वाळीत टाकण्याचे हे ३७वे प्रकरण उघडकीस आले आहे.
या वाळीत प्रकरणाची कुणकुण लागल्यावर अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी दीपक क्षीरसागर, तहसीलदार विनोद खिरोडकर व अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत चौधरी यांनी श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टी, वरसोली कोळी समाज पंच समिती सदस्य व वरसोलीचे ग्रामस्थ यांची बैठक घेऊन वाळीत टाकणे वा सामाजिक बहिष्कार टाकणे हा गुन्हा आहे. असा प्रकार गावांत होऊ देऊ नये, असे आवाहन करून लोकप्रबोधन केले होते, परंतु भगत यांना वाळीत टाकण्याचा निर्णय मागे घेण्यात आला नाही व अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या या ४७ जणांमध्ये श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टचे विजय बना, परशुराम दांडेकर, नारायण पाटील, अरुण मेस्त्री, धर्मा घारबट, ज्ञानेश्वर जायनाखवा, प्रभाकर पाटील, दिलीप कोळण, बाळकृष्ण भगत, दत्ताराम भगत, गणेश भगत, बाळकृष्ण वाकटी, मदन बना, वरसोली कोळी समाज पंच समितीचे गणेश आवारी, दत्ताराम घारबट, रवींद्र पाटील, जगदीश नवगावकर आदींसह ४७ ग्रामस्थांचा समावेश आहे.