मशीदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंवर नाराज झालेले पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी ठाण्यात ठाकरेंच्या उत्तर सभेची सुरुवात केली. यावेळी भाषणाच्या ओघात त्यांनी राज ठाकरेंची तब्येतीत चढउतार होत असल्याचे सांगितले.
राज ठाकरेंची गेल्या तीन महिन्यांपासून तब्येत बिघडलेली आहे. साहेबांना त्रास होतोय हे मी काल पाहिले. त्यांना एकेक पायरी चढण्यासाठी त्रास होत होता, तरीही ते दहा दहा पायऱ्या चढून ते कार्यकर्त्यांच्या घरी जात होते. अशा परिस्थितीतही राज ठाकरे काम करत आहेत, असे ते म्हणाले.
पुण्यात मनसेने काम केले. गोरगरीबांना फायनान्स, बँका वाल्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. अशावेळी मनसेची दारे उघडी होती. लोकांना फायनान्स वाला, बँकेवाला दारात आला की मनसेवाला आठवतो. जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा मनसेवाला कुठे जातो, तेव्हा का नाही मनसेवाला आठवत, असा प्रश्न उपस्थित केला.
सोळा वर्षांमध्ये १६ गार्डन करणारा मी एकमेव नगरसेवक. मला पुरस्कार देताना चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे होत्या. पाटील म्हणाले, तुम्ही भाजपात या, नगरसेवक व्हाल, तेव्हा मी त्यांना उत्तर दिले, मी गेली १५ वर्षे भाजपाच्याच नगरसेवकांना पाडून नगरसेवक होतोय, असा किस्साही त्यांनी सांगितला.
गेल्या चार पाच दिवसांत तुम्ही पाहिले असेल. महाराष्ट्रात एकही पक्ष राहिला नाही ज्याने मला ऑफर दिली नाही. अमेरिकेतील लोकही आपल्याला तिकडे बोलवून घेतील एवढी मनसेचे नगरसेवक कामे करतात, जी काही उत्तरे द्यायची ती राज ठाकरे देतील. माझ्या एकनिष्ठेला तुम्ही जो पाठिंबा दिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. असे ते म्हणाले.