नितीन गव्हाळे/ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 28 - कृषी विद्यापीठात बीटेक, एमटेक किंवा कृषि अभियांत्रिकीच्या शिक्षणातून संशोधन करून कृषी तंत्रज्ञान विकसित करणारे अनेक आहेत. परंतु कृषीचे कोणतेही शिक्षण न घेतलेला, केवळ बारावी शिकलेला युवा शेतकरी कृषी शास्त्रज्ञांनाही लाजविणारे कृषि तंत्रज्ञान विकसित करून समाजासमोर आणण्यासाठी धडपडतो आहे. पळसो बढे येथील राजेश शालिग्राम रेवस्कर यांनी वेस्टेज साहित्याचा वापर करून अनोखे पेरणीयंत्र बनविले आहे. एवढेच नाही तर शेत मशागतीसाठी ट्रॅक्टरला लोखंडी चाके जोडून अनोखे संशोधन समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये पळसो बढे येथील युवा शेतकरी राजेश रेवस्कर यांचा एक स्टॉल आहे. त्यांनी केलेले कृषी संशोधन वाखाणण्यासारखेच आहे. बारावी उत्तीर्ण राजेशकडे दहा एकर शेती आहे. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी राजेशच्या खांद्यावर आली. सुरुवातीपासूनच राजेश चिकित्सक वृत्तीचा. परंतु परिस्थितीअभावी त्याला पुढील शिक्षण घेता आले नाही. परंतु त्याने स्वत:च्या चिकित्सक बुद्धिमत्तेतून सायकलच्या चाकांवर चालणारे पेरणीयंत्र अत्यंत कमी किमतीत बनविले. त्याच्या पेरणी यंत्राचे सर्वत्र कौतुक झाले. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी देखील त्याचे कौतुक केले. पेरणीयंत्रामध्ये त्याने सायकलच्या दोन चाकांसह १८0 एमएमचे पीव्हीसी पाइप, दोन झाकण, चौरस पाइप, प्लॅस्टिकच्या तीन चाळ्या आणि तीन लोखंडी दात्यांचा वापर केला आहे. राजेशने हे पेरणीयंत्र पाहणी व विक्रीसाठी कृषि प्रदर्शनात मांडले. शेतकरी त्याने बनविलेले पेरणीयंत्र पाहून राजेशचे कौतुक करतात. ग्रामीण भागात राहणाऱ्या राजेशने संशोधन करून शेतकऱ्यांसाठी अनोखे असे पेरणीयंत्र बनवून युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. पैसा कमाविण्यासाठी शिक्षण ही गौण बाब आहे. आलेल्या अनुभवातूनच माणूस यश गाठू शकतो, हे राजेशने कृतीतून दाखवून दिले. शेतीची मशागत करण्यासाठी आता सर्रास ट्रॅक्टरचा वापर होतो. शेताची मशागत करताना ट्रॅक्टरच्या रबरी चाकांची झिज होते. एवढेच नाही तर ही मातीमध्ये चाके स्लिप होतात. हे राजेशच्या चिकित्सक वृत्तीने न्याहाळले आणि त्याच्या डोक्यात कल्पना आली, ती ट्रॅक्टरला लोखंडी चाके बसविण्याची. त्याने स्वत:च्या ट्रॅक्टरवर हा प्रयोग केला. ४0 हजार रुपयांचा खर्च करून त्याने स्वत:च लोखंडी चाकांचे डिझाईन बनविले. चाके तयार करून घेतल्यानंतर ही ट्रॅक्टरला जोडली आणि ट्रॅक्टर शेतात घातला आणि काय आश्चर्य, ट्रॅक्टरने अत्यंत चांगल्या प्रकारची मशागत करता येत होती. त्याचा प्रयोग यशस्वी झाला. कृषी प्रदर्शनात राजेश ट्रॅक्टरला लावलेल्या लोखंडी चाकांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवित आहे.
https://www.dailymotion.com/video/x844mrk