नवी मुंबईत उभारणार व्यंकटेश्वर मंदिर; भाडेपट्ट्याने दहा एकर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 08:36 AM2022-04-21T08:36:33+5:302022-04-21T08:39:27+5:30

तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगलुरू, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराच्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.

Venkateswara temple to be built in Navi Mumbai; Cabinet approves lease of 10 acres | नवी मुंबईत उभारणार व्यंकटेश्वर मंदिर; भाडेपट्ट्याने दहा एकर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

संग्रहित छायाचित्र.

Next

मुंबई : नवी मुंबईतील उलवे येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानला एक रुपया प्रति चौरस मीटर या नाममात्र दराने भाडेपट्ट्यावर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली.

तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगलुरू, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराच्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या धर्तीवर नवी मुंबईमध्ये मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानने जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

नवी मुंबईतील श्री व्यंकटेश्वराचे मंदिर भाविकांसाठी, तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे या परिसराला धार्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त होऊन स्थानिक परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या देवस्थानमार्फत या परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

श्यामराव पेजे महामंडळाला १०० कोटींचे भागभांडवल -
श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे अधिकृत भागभांडवल १०० कोटी रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. आतापर्यंत हे भागभांडवल केवळ १५ कोटी रुपये होते. कोकणातील इतर मागासवर्गीयांना आजच्या निर्णयाचा फायदा होईल.

गगनगिरी ट्रस्टच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण -
मुंबईतील मौजे मनोरी (ता.बोरीवली) येथील स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टला दिलेल्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्याचे पुढील ३० वर्षांसाठी नूतनीकरण करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या ट्रस्टला ४ एप्रिल, १९९० रोजी वार्षिक एक रुपया भाड्याने तीस वर्षांसाठी जमीन देण्यात आली होती. ही मुदत एप्रिल, २०२० मध्ये संपली होती. आज पूर्वलक्षी प्रभावाने भाडेपट्टा नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला.

राज्य कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात वाढ -
राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात वाढ केली आहे. वाहतूक भत्ता असा असेल - एस २० आणि त्यावरील कर्मचारी- मुंबई महानगर प्रदेश, नागपूर व पुणे महानगर प्रदेशसाठी ५,४०० रुपये, एस ७ ते एस १९ वेतनस्तर असणाऱ्यांसाठी २,७०० रुपये, तर एस १ ते एस ६ स्तरापर्यंत १,००० रुपये. इतर ठिकाणी हा भत्ता अनुक्रमे २,७०० रुपये, १,३५० रुपये आणि ६७५ रुपये इतका असेल.

शालेय शिक्षणासाठी वार्षिक योजनेत पाच टक्के निधी -
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या योजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर, विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे. हा निर्णय मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी लागू राहणार नाही.

राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने समितीची पुनर्रचना -
- राज्य सरकारने राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीची पुनर्रचना केली आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री हे या समितीचे अध्यक्ष, राज्यमंत्री हे उपाध्यक्ष आहेत.

- समितीमध्ये संचालक, शासकीय मुद्रणालय, लेखा सामग्री व प्रकाशन, मुंबई, डॉ. प्रकाश पवार कोल्हापूर, रमेश चव्हाण पुणे, डॉ. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ वर्धा, डॉ. सोनाली रोडे, सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई विभाग, डॉ. शैलेद्र खरात पुणे, डॉ. मंजुश्री जयसिंगराव पवार कोल्हापूर, प्रभाकर अश्रोबा ढगे गोवा, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर सातारा, डॉ. दत्ता पवार मुंबई, डॉ. नारायण भोसले, मुंबई, प्रा. राजेश्वरी देशपांडे, राज्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राम जगताप ठाणे, राजेंद्र साठे मुंबई, डॉ. राजहंस कपिल अनारपिंड, कोल्हापूर, हे सदस्य असतील. डॉ. विजय चोरमारे, मुंबई हे सदस्य सचिव असतील.

Web Title: Venkateswara temple to be built in Navi Mumbai; Cabinet approves lease of 10 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.