ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेला "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर" हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईच्या स्टार सहारा हॉटेलमध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत झोकात पार पडला. यावेळी सेवाव्रतींचा गौरव करण्याबरोबर मनोरंजनाचे काही हलकेफुलके क्षणही प्रेक्षकांनी अनुभवले.
यूपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर’ पॉवर्ड बाय कर्म इन्फ्रास्ट्रक्चर आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने झालेला अत्यंत देदीप्यमान असा हा सोहळा उत्तरोत्तर अधिकच रंगला.
लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांच्या आग्रहाखातर अभिनेत्री आलिया भट्ट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी "तेरी गलिया" हे गाणे एकत्र गायले. अमृता फडणवीस यांनी टि्वट करुन पुरस्कार सोहळयात आनंददायक क्षण अनुभवल्याचे सांगितले.
आपल्या कर्तृत्वाने, परिश्रमाने, साधनेने आणि संशोधनाने ज्यांनी महाराष्ट्राची शान वाढविली अशा विविध १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव होताना, उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करत पुरस्कारविजेत्यांचे कौतुक केले.
प्रख्यात नृत्यांगना शर्वरी जेमनिस आणि त्यांच्या संचाने सादर केलेल्या गणेश वंदनेने या सोहळ्याचा शुभारंभ झाला. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी आपल्या प्रास्ताविकात या पुरस्कार सोहळ्यामागची भूमिका विषद करत सर्वच कॅटेगरीतील नॉमिनींच्या कर्तृत्वाचा आवर्जुन उल्लेख केला. अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मलखांबावर केलेल्या कसरती पाहून उपस्थित ‘मेस्मराइज’ झाले, तर फ्युजन आॅफ आॅडिओ व्हिज्युअल आर्ट सादर करणाऱ्या चमूने ‘लोकमान्य’ आणि ‘लोकमत’ यांचा सुरेख मेळ साधला. सांयकाळी सहा वाजता सुरू झालेला हा सन्मान सोहळा उत्तरोतर वाढत जात रात्री दहाच्या सुमारास पार पडला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. तब्बल पावणेतीन तास रंगत गेलेल्या या सोहळ्यास गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्रीगणांची शेवटपर्यंत असलेली उपस्थिती खास वैशिष्टयपूर्ण ठरली.
https://www.dailymotion.com/video/x844vmi