विवेक चांदूरकर
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. २७ - सुखकर्ता, दुखहर्ता गणपतीची आराधना अनेकजण बुद्धी व मंगलमय जीवनासाठी करीत असतात. मात्र, तालुक्यातील सर्व गावातील शेकडो ग्रामस्थांना गणेशाने रोजगार दिला असून, वर्षभर गणेश मूर्तींची निर्मिती करून संपूर्ण
महाराष्ट्रात विक्री करून मूर्तीकार लाखो रूपये कमावितात. तालुक्यातील सव हे एक छोटेस गाव प्रसिद्ध आहे ते गणेश मूर्तीसाठी.
साधारणता गणेश मूर्ती गणेश उत्सवाच्या एक ते दोन महिन्याआधी बनविण्याला सुरूवात होते. मात्र, सव या गावात वर्षभर गणेश मूर्ती तयार करण्यात येतात. गावात अनेक घरांमध्ये गणेश मूर्तीचे कारखाने असून, प्रत्येकजण मूर्तीकार आहे. गावात फुलचंद पेंढारकर, शाम पलई, माधुरी पलई, मदन मोहन पलई, सुनील पलई यांचे मूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत. गणेशाची मूर्ती बनविण्याचा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब मूर्ती बनविण्याचेच काम करीत असून, अन्य कोणताही व्यवसाय करीत नाहीत. गत काही वर्षांमध्ये सव येथे गणेशाच्या मूर्ती मिळत असल्याची वार्ता सर्वत्र पसरली असल्यामुळे येथे ठोक व्यावसायिक मूर्तीची खरेदी करण्याकरिता येतात.सव येथे एक मूर्तीकाराचे कुटुंब वर्षभरात दहा ते पंधरा हजार मूर्ती तयार करतो. अनेकांच्या घरामध्ये मूर्ती साठवून ठेवलेल्या असतात. येथील मूर्ती औरंगाबाद, पुणे, जळगाव खानदेश, एरंडोल, भुसावळ आदि ठिकाणी विकल्या जातात. ठोक व्यापारी येथे येवून मूर्ती घेवून जातात. दोन फुटापासून तर दहा ते पंधरा फुटापर्यंतच्या मूर्ती येथे बनविण्यात येतात. दरवर्षी चार ते पाच हजार मूर्ती बनवून तिची विक्री करण्यात येत असल्याचे मूर्तीकार पेंढारकर यांनी सांगितले. यामध्ये त्यांना चार ते पाच लाख रूपयांपर्यंत दरवर्षी उत्पन्न मिळते.
कुुटुंबातील प्रत्येक सदस्य मूर्तीकार
सव येथे काही कुटुुंब पिढ्यांपिढ्यापासून मूर्ती बनविण्याचे काम करीत आहे. त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत मूर्ती बनविण्याच्या कामात हातभार लावतात. प्रत्येक जण जमेल ते काम करतात. सध्या सर्व येथे मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला असून, मूर्तीला अंतिम रूप देण्याची लगबग सुरू आहे.
नव्या ट्रेन्डनुसार बनवितात मूर्ती
गणेशाची मूर्ती बनविताना बाजारात कशाचा ट्रेन्ड सुरू आहे. याची माहिती घेवून मूर्ती बनवाव्या लागतात. दरवर्षी नवीन चित्रपट, राजकीय घडामोंडींवर लक्ष ठेवून मूर्ती बनविण्यात येतात.