VIDEO: देवेंद्र फडणवीसांनी पुरवला ‘बर्थडे गर्ल’चा हट्ट; चिमुकलीने दिले गुलाबजाम खाण्याचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 08:48 AM2021-12-03T08:48:27+5:302021-12-03T08:55:09+5:30
गुरुवारी दापोलीचे भाजप उपाध्यक्ष केदार साठे यांच्या चार वर्षीय मुलीचा वाढदिवस होता. पक्षाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ कॉलवरुन चिमुकल्या प्रचितीला शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी: स्थानिक पातळीवर पक्ष मजबुत करण्यासाठी राजकीय पक्ष विविध ठिकाणी बैठका, सभांचे आयोजन करत असतात. अशावेळी फक्त राजकीय विषयांवरच चर्चा होत असते. पण, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका बैठकीत त्यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. दापोलीत आयोजित भाजपच्या बैठकीत फडणवीसांनी एका चिमुकलीशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. याचा एक व्हिडीओही पुढे आला आहे.
फडणवीसांनी पुरवला चिमुकलीचा हट्ट
सध्या कोकण विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये भाजपच्या आढावा बैठकी होत आहेत. यावेळी दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठे सुद्धा या बैठकीला आले होते. पण, काल त्यांची चार वर्षांची मुलगी प्रचितीचा वाढदिवस होता. तिने आपल्या बाबांना वाढदिवशी बैठकीला जाऊ जाऊ नका, असा हट्ट केला.
पाहा व्हिडिओ:
तुम्ही जर देवेंद्र फडणवीस काकांकडून मला ‘हॅप्पी बर्थडे’चा फोन करणार असाल तरच बैठकीला जा, नाहीतर जाऊ नका!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 2, 2021
नेता आणि परिवार असावा तर असा!
झाले असे की, आज कोकण विभागातील विविध जिल्ह्यांच्या भाजपाच्या आढावा बैठकी होत्या. दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठे सुद्धा या बैठकीला निमंत्रित होते. pic.twitter.com/braELAAq4l
पक्षाची बैठक महत्वाची असल्याने साठेंना उपस्थित राहाणे गरजेचे होते. त्यामुळे साठेंनी आपल्या मुलीची समजूत काढली. पण, प्रचितीने वेगळाच हट्ट धरला. 'देवेंद्र फडणवीस काका मला शुभेच्छा देणार असतील, तरच मी तुम्हाला बैठकीला जाऊ देईन', असा हट्ट तिने धरला. मुलीच्या हट्टासमोर बाप काय करणार. अखेर बैठक संपल्यानंतर केदार साठेंनी सगळा किस्सा देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकला आणि फडणवीसांनीही प्रचितीला व्हिडीओ कॉलवर शुभेच्छा दिल्या.
गुलाबजाम खाण्याचं निमंत्रण
यावेळी फडणवीस आणि चिमुकल्या प्रचितीचे संभाषण पाहून कार्यकर्तेही कौतुक करु लागले. यावेळी फडणवीसांनी प्रचितीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर, प्रचितीने त्यांना घरी गुलाबजाम खायला येण्याचे आमंत्रण दिले. या गोंडस संभाषणाचा व्हिडीओ भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे.