VIDEO : संघभूमीत मराठा मोर्चाचा हुंकार
By admin | Published: October 25, 2016 03:02 PM2016-10-25T15:02:53+5:302016-10-25T15:24:00+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच ‘अॅट्रोसिटी’ कायद्याचा फेरविचार व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी नागपुरात आज मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २५ - मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच ‘अॅट्रोसिटी’ कायद्याचा फेरविचार व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी नागपुरात मंगळवारी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिर परिसराच्या शेजारीच असलेल्या रेशीमबाग मैदानावरुन या मोर्चाला सुरुवात झाली हे विशेष. नागपुरातील या मोर्चाला हजारोंच्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते. काटेकोरपणे नियोजन केल्यामुळे प्रचंड गर्दी होऊनही अतिशय शांततेत मोर्चा सुरू झाला.सकाळी १० वाजल्यापासूनच रेशीमबाग मैदानावर मराठा बांधव जमण्यास सुरुवात झाली होती. जागोजागी स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी शिस्त दिसून येत होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन व जिजाऊ वंदना झाल्यानंतर काही तरुणींनी कोपर्डी येथील दुर्दैवी घटना, ‘अॅट्रोसिटी’ कायद्याचा दुरुपयोग याबाबत आपली मते मांडली. त्यानंतर दुपारी १२ वाजता मराठा क्रांती मूक मोर्चा कस्तुरचंद पार्कच्या दिशेने निघाला. दिव्यांग मराठा तरुण जयसिंग चव्हाण हे या मोर्चात सर्वात समोर होते. शिवाजी महाराज आणि जिजाऊच्या वेशभूषेतील बालके, काळी साडी परिधान केलेल्या महिला आणि काळे टी शर्ट परिधान केलेला युवा वर्ग कस्तुरचंद पार्ककडे मार्गक्रमण करू लागला.मोर्चात मुधोजीराजे भोसले, रघुजीराजे भोसले, जयसिंगराजे भोसले यांच्यासह भोसले राजघराण्यातील सदस्य, ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे इत्यादी सर्वपक्षीय मराठा नेतेमंडळी सहभागी झाली होती.‘अॅम्बुलन्स’ला दिला मार्गमराठा मोर्चा गांधीसागर तलावाजवळ पोहोचला असताना अचानक रुग्णवाहिकेचा ‘सायरन’ ऐकू आला. रस्त्यावर मोर्चेक-यांची गर्दी होती. मात्र स्वयंसेवकांनी पुढे सरसावत तातडीने रस्ता रिकामा करुन दिला. त्यामुळे रुग्णवाहिकेला सहजपणे जाता आले.