महिला पोलीस अधिका-यास मारहाणीचा व्हीडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:53 AM2017-12-06T03:53:40+5:302017-12-06T03:53:50+5:30
गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे यांना संशयित
कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे यांना संशयित वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय श्यामसुंदर कुरुंदकर (रा. मूळ गाव आजरा, सध्या ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकारी) हे मारहाण करीत असल्याचा व्हीडीओ मंगळवारी वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली.
या प्रकरणी ३१ जानेवारी २०१७ रोजी कळंबोली पोलीस ठाण्यात कुरुंदकर यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांना तपासादरम्यान बिद्रे यांच्या लॅपटॉपमध्ये प्रत्येकी अर्ध्या तासाच्या सहा क्लिप्स, ३९ आॅडिओ व साडेचार हजार व्हॉट्सअॅप छायाचित्रे मिळाली आहेत. त्यातील दीड हजार छायाचित्रे या प्रकरणाच्या तपासावर प्रकाशझोत टाकणारी असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
अश्विनी गोरे बेपत्ता झाल्या असल्याची तक्रार १४ जुलै २०१६ रोजी पोलिसांत दिली;आता पंधरा दिवसांत या प्रकरणाचा छडा न लागल्यास आम्ही कुटुंबासह नागपूरला हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या दारात जाऊन आमरण उपोषणास बसणार आहोत.
- आनंद बिद्रे, अश्विनी बिद्रे यांचा भाऊ